मुंबई: ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावातील गाळ काढताना पायऱ्यांचे नुकसान करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. आयुक्तांनी गुरुवारी या बाणगंगा तलावाच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. पायऱ्यांचे नुकसान करतानाच पुरातत्त्व विभागाच्या नियमांचाही कंत्राटदाराने भंग केला असल्यामुळे या घटनेला गंभीर वळण आले आहे.

दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाची कामे सध्या सुरु आहेत. या कामांची पाहणी करण्यासाठी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तलाव परिसराला भेट दिली. यावेळी पालिकेच्या डी विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे तलावाच्या पायऱ्या, पायऱ्यांचे दगड, दीपस्तंभांची दुरावस्था झाली होती. तसेच तलाव परिसरात पायऱ्यांवरील बांधकामे झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेमार्फत बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत तलावातील गाळ काढण्यासाठी प्रारंभी कंत्राटातील अटीनुसार हस्तचलित यंत्रणा उभी करण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने २४ जून रोजी एक्सकॅव्हेटर संयंत्र बाणगंगा तलावाच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वाराने उतरवले. त्यामुळे पायऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी गुरुवारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व वरील निर्देश दिले. तलावाच्या पायऱ्यांची हानी केल्याबद्दल बाणगंगा प्रकल्पाचे कंत्राटदार मे. सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यासोबतच पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार उर्वरित टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच तलावातील गाळ काढण्याचे काम हस्तचलित यंत्रणेद्वारे (मॅन्युअल पद्धतीने) करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

हेही वाचा : मेट्रो ३ : आरे ते बीकेसी टप्प्याच्या आरडीएसओ चाचण्या पूर्ण, आता लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला होणार सुरुवात

तलावांच्या पायऱ्यांचे नुकसान केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारास महानगरपालिकेच्यावतीने यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तलावास हानी पोहोचवून नुकसान केल्याबद्दल मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रारही २५ जून रोजी दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, हानी पोहोचलेल्या पायऱ्या दुरुस्त करण्याची कामे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्याचदिवशी त्वरित पूर्ववत करून पायऱ्या करण्यात आल्या आहेत.

बाणगंगा परिसर आणि याठिकाणची मंदिरे यांच्याशी संबंधित कामांमध्ये योग्य आदर ठेवला जाणे अपेक्षित आहे. पुरातत्त्व विभागाशी समन्वय साधत येत्या दिवसात बाणगंगा परिसरातील उर्वरित कामे ही नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्तांनी दिल्या. उर्वरित गाळ काढण्याची कामे यापुढच्या काळात हस्तचलित यंत्रणेच्या पद्धतीने करण्यात येतील, असेही आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा : कोकण रेल्वे पनवेलपर्यंतच! पुढील एक महिना काही गाड्या एलटीटीऐवजी पनवेलपर्यंतच धावणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागाच्या माध्यमातून बाणगंगा परिसरात पर्यटन स्थळ विकासासाठी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेच. तलाव परिसरातील बांधकामे डी विभागामार्फत निष्कासित करण्यात आली आहेत. तसेच दीपस्तंभ आणि पुरातन वारसा जतन (हेरिटेज) ची कामे पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शशी प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.