लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे माणसांना होणाऱ्या संक्रमणाचा धोका कमी करणे, तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत विविध संस्थांच्या साहाय्याने मुंबई महानगरातील किमान ७० टक्के श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत २५ हजार श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे.
रेबीजची लागण झाल्यामुळे होणारे मानवी मृत्यू टाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प हाती घेतला आहे. यात भटक्या श्वानांच्या लसीकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी उद्दिष्टे साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. विशेषतः रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे, रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे व त्याद्वारे भटक्या श्वानांच्या चाव्यामार्फत होणाऱ्या रेबीजच्या मानवी संक्रमणाचा धोका कमी करणे, प्राणी कल्याण संरक्षण करणे, रेबीजचा प्रसार कमी करून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आदी उद्दिष्टे महत्त्वाची आहेत.
आणखी वाचा-गोवंडीमधील झोपडपट्टीला भीषण आग; सुदैवाने कोणीही जखमी नाही
याबाबत पशुवैद्यकीय विभाग आणि देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले की, सप्टेंबर २०२३ पासून मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्पाअंर्तगत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी निरंतर अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान अविरतपणे सुरू आहे. रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जॅनीसी स्मिथ ॲनिमल वेल्फेअर ट्रस्ट, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स, युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी आणि उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांतील प्रशिक्षित पशुवैद्यकीय तज्ञांच्या साहाय्याने हे लसीकरण करण्यात येईल, अशी माहिती डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे.
आणखी वाचा-माहीम कोळीवाड्यातील पहिल्या ‘सी फूड प्लाझा’ला मुंबईकरांची पसंती
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या निरंतर अभियानामध्ये नागरिकांचे सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांनी आपल्या भागातील भटक्या श्वानांची माहिती द्यावी, तसेच लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
२०१४ च्या गणनेनुसार मुंबई महानगरात भटक्या श्वानांची संख्या सुमारे ९५ हजार इतकी आहे. त्यापैकी सुमारे २५ हजार भटक्या श्वानांचे सप्टेंबर २०२३ पासून आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहेत. तर, मार्च २०२४ च्या अखेरपर्यंत सुमारे ७० टक्के श्वानांचे लसीकरण करण्यात येणार आहे.