प्रसाद रावकर, लोकसत्ता
मुंबई : दरवर्षी पावसाळय़ात खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांत रस्ते खड्डेमुक्त करण्याची केलेली घोषणा लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांतील तब्बल ४५० लहान रस्त्यांवरील ५०० ते एक हजार मीटर लांबीच्या टप्प्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी निविदा मागविण्यात आल्या असून पुढील तीन आठवडय़ांत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी निविदा प्रक्रियेतील नियम कडक करण्यात आले असून हमी कालावधीत दरवर्षी रस्त्यांचा दर्जा तपासण्यात येणार आहे. त्यानंतरच कंत्राटदाराला कंत्राटातील २० पैकी २ टक्के रक्कम देण्यात येणार आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांवर टीका होऊ लागली आहे. एकूणच प्रकरणांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ िशदे यांनी दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली होती.
महानगरपालिकेने मुंबईमधील सुमारे ४५० लहान रस्त्यांवरील ५०० ते एक हजार मीटर लांबीच्या टप्प्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे साडेपाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबई शहर भागात एक, पूर्व उपनगरात एक, तर पश्चिम उपनगरांत तीन अशा एकूण पाच निविदा मागविण्यात आल्या आहेत. पुढील तीन आठवडय़ांमध्ये निविदा उघडण्यात येतील. तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू करण्यात येतील, असे रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर फेब्रुवारी-मार्चमध्ये आणखी ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत.
कंत्राटदारांना वेसण
दुरुस्ती केल्यानंतरही रस्त्यांवर वारंवार खड्डे पडत असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे रस्ते कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने दुरुस्त करण्यात येणाऱ्या रस्त्यांचा हमी कालावधी १० वर्षे केला असून या रस्त्यांची पुढील १० वर्षे संबंधित कंत्राटदारावरच जबाबदारी असणार आहे. यापूर्वी हा हमी कालावधी पाच वर्षे होता. इतकेच नव्हे तर कंत्राटापैकी २० टक्के रक्कम महानगरपालिकेच्या तिजोरीतच जमा राहणार आहे. नागरिकांना माहिती मिळणार
रस्त्यांची कामे सुरू करण्यापूर्वी संबंधित ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी रस्तारोधक उभे करण्यात येतात. आता या रस्तारोधकांवर एक कोड क्रमांक देण्यात येणार आहे. मोबाइलमध्ये तो स्कॅन केल्यानंतर संबंधित कामाविषयीची माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर पावसाळय़ात पाणी साचू नये यासाठी ‘सोकपिट’ची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दरवर्षी पावसाळय़ात मुंबईतील रस्त्यांवर पडणारे खड्डे चर्चेचे विषय बनतात. रस्त्यांच्या दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येते. मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा आणि नागरिकांची या त्रासातून सुटका करण्यासाठी मुंबईतील रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी निविदा मागविल्या असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून ही कामे सुरू करण्यात येतील.
– पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त,मुंबई महानगरपालिका