मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ऑनलाईन पद्धतीने दंड वसुलीला सुरुवात केली आहे. हा पथदर्शी प्रकल्प पालिकेच्या ए विभागात राबविण्यात आला असून कारवाईच्या पहिल्या दिवशी ७२ हजार रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत महानगरपालिका प्रशासनाकडून तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. प्रशिक्षित क्लिन अप मार्शलच्या माध्यमातून पालिकेच्या ए विभागात या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्लिन अप मार्शल कारवाई करताना मोबाइल ॲपद्वारे छापील पावती देण्यात येत आहे. तसेच, नागरिकांनाही ऑनलाईन पद्धतीने दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मलमूत्र विसर्जित करणे, ओला व सुका कचऱ्याचे विलिगीकरण करणे, रस्त्यावर कचरा जाळणे, उघड्यावर कपडे व गाड्या धुणे, वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणे, अनधिकृत फलक, बॅनर लावणे विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर बुधवारी क्लिन अप मार्शलांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईतून सुमारे ७२ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा : पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मोटरीसोबत फरफटत नेले

क्लिन अप मार्शलकडे असलेल्या मोबाइलमध्ये महानगरपालिकेने तयार केलेले क्लिन अप मार्शल सिस्टीम ॲप आहे. यात स्वच्छतेचे नियम व नियम मोडल्याबद्दल आकारावयाची निश्चित रक्कम आधीपासूनच समाविष्ट केली आहे. स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना क्लिन अप मार्शलकडून ऑनलाईन पावती देण्यात येत आहे. त्यासाठी, क्लिन अप मार्शलकडे मोबाइल ब्लूटूथ वर चालणारा छोटा प्रिंटर देखील देण्यात आला आहे. आकारलेल्या दंडाकरिता या प्रिंटरद्वारे पावती दिली जाणार आहे. गैरवापर टाळण्यासाठी ॲपशी संलग्न अशा प्रिंटरच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पावतीचाच वापर केला जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation clean up marshal 75 thousand online fine on the first day mumbai print news css