मुंबई : आझाद मैदान, दादरचे शिवाजी महाराज मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान अशा मुंबईतील विविध मैदानांच्या स्वच्छतेसाठी मुंबई महापालिका एक विशेष स्वच्छता मोहीम राबवणार आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या नसलेल्या मैदानांमध्येही १ ते ४ एप्रिलदरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून शाळांच्या स्वच्छतेची विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने गेल्या काही आठवड्यांपासून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत रुग्णालये, महामार्गांची स्वच्छता करण्यात आली असून आता मुंबई महापालिकेने सोमवार, १ एप्रिलपासून क्रीडांगणे आणि शाळांमध्ये ‘विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरवले आहे. १ ते ४ एप्रिलदरम्यान क्रीडांगणांमध्ये आणि ७ एप्रिलपासून पुढील १५ दिवस (दर आठवड्याला सोमवार ते शुक्रवार) शाळांमध्येही स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.

महानगरपालिकेच्या संपूर्ण २४ प्रशासकीय विभागांमध्ये सातत्याने स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाते. या मोहिमेत आता शैक्षणिक संस्था आणि क्रीडांगणांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, अशी माहिती उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिली.

सोमवारी १ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या विशेष स्वच्छता मोहीमेत आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, सोमय्या मैदान, अंधेरी क्रीडा संकुल, कोरा केंद्र (बोरिवली), मुलुंड क्रीडा संकुल येथे स्वच्छता करण्यात येणार आहे. मुंबईतील मैदाने ही विविध प्राधिकरणांच्या मालकीची आहेत. मात्र या मैदानांच्या स्वच्छतेसाठी त्या त्या प्राधिकरणांकडे तितके मनुष्यबळ नसते. त्यामुळे मैदानांमध्ये बराचसा कचरा, प्लास्टिक, कागद महिनोंमहिने पडून असतो. हा सगळा कचरा या मोहीमेत हटवण्यात येणार आहे.

शाळांमध्ये स्वच्छता मोहीम

सोमवार, ७ एप्रिल २०२५ पासून पुढील १५ दिवस महानगरपालिका शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासह सर्व शासकीय शाळा, शैक्षणिक संस्था, खासगी शाळांमध्येही स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे. क्रीडांगणांमधील स्वच्छता मोहीम संबंधित प्रशासकीय विभागांद्वारे (वॉर्ड) आयोजित केली जाईल. प्रत्येक विभाग या मोहिमेदरम्यान स्वच्छतेची आवश्यक असलेल्या ठिकाणांना प्राधान्य देणार आहे. यात खेळाचे मैदान, शाळेचा परिसर, वाहनतळ, कचरा संकलन आदी ठिकाणे आणि पदपथ यांचा समावेश असेल.

नागरिकांचा सहभाग

शाळा आणि क्रीडांगणांवर दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ही मोहीम पार पाडणार आहे. या मोहिमेत महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग, शाळा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, राष्ट्रीय सेवा योजना, शालेय विद्यार्थी (इयत्ता ८ वी वर्गापुढील), महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसहायता गट (एसएचजी), गृहनिर्माण संस्था आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय नागरिक आदींना सहभागी करून घेतले जाणार आहे.

स्वच्छतेसाठी उपकरणांचा वापर

या मोहिमेत मेकॅनिकल पॉवर स्वीपर, कचरा वेचक, मिस्टिंग मशीन, डंपर, जेसीबी, पाण्याचे टँकर आणि फायरएक्स उपकरणांचा वापर केला जाणार आहे.