मुंबई : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’मध्ये मुंबई महानगरपालिका सहभागी झाली असून या सर्वेक्षणासाठी मुंबईत स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीतील उपहारगृह, शाळा, रुग्णालये (आरोग्य सुविधा), निवासी संकुल, शासकीय कार्यालये आणि बाजार संघटनांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचा कानमंत्र; म्हणाले, “लोकांपर्यंत जाऊन…”

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’त मुंबई महानगरपालिका सहभागी होत आली आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’मधील निकषांची पूर्तता करण्यासाठी महानगरपालिकेने स्वच्छता स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत मुंबईतील उपहारगृह, शाळा, रुग्णालये (आरोग्य सुविधा), निवासी संकुल, शासकीय कार्यालये आणि बाजार संघटनांना आदींना सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना ‘स्वच्छ भारत अभियान’ या विषयावरील जिंगल, चित्रफित, भित्तीचित्र, पथनाट्ये सादर करण्याची संधीही मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २९ जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा >>> VIDEO : ‘मंजिल एक दिन आयेगी…’ नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसात नरेश म्हस्केंची शायरी; म्हणाले “आमदारकीसाठी…”

मुंबई महानगरपालिकेने ही स्पर्धा घेण्यासाठी युनायटेड वे मुंबई या संस्थेची नियुक्ती केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्ती, गटाने  https://www.unitedwaymumbai.org/bmcswachhsurvekshan23 या लिंक अर्ज करावा. इच्छुक स्पर्धकांनी आपले अर्ज २९ जानेवारीपर्यंत लिंकवर पाठवावेत, असे घनकचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता भारत तोरणे यांनी या संदर्भात बोलताना सांगितले. स्पर्धेमधील प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन मुंबई महानगरपालिकेतर्फे गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत एकूण ८ प्रमुख गट असून ५० पेक्षा अधिक व्यक्तिंना बसण्याची क्षमता असलेल्या हॉटेल्स, महानगरपालिका शाळा, खासगी शाळा, महानगरपालिका रुग्णालये, खासगी रुग्णालये, १ ते १०० सदनिका असलेले निवासी संकुल, १०१ ते ५०० सदनिका असलेले निवासी संकुल, शासकीय व निम शासकीय कार्यालय, मंडई, कचरा वर्गीकरण – खतनिर्मिती – घन कचरा व्यवस्थापन इत्यादीबाबत जिंगल, चित्रफित, पोस्टर, पथनाट्य यांसारख्या विविध विषयांचा स्पर्धेसाठी विचार करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२३८५-०५७२ वर संपर्क साधावा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation cleanliness competition for centre swachh survekshan 2023 mumbai print news zws