मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांना तीन वर्षांचा निकष लागू करू नये म्हणून राज्य सरकारने केलेली मागणी निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा सोमवारी फेटाळली. निवडणूक आयोगानेच चहल यांना पदावरून हटवले आहे. तशी घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने फेब्रुवारी अखेरीस दिला होता. या आदेशामुळे चहल यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार होत्या. थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी नसल्याने आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांना आदेशातून वगळावे, अशी विनंती करणारे पत्र राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पाठविले होते. मात्र आयोगाने सरकारची ही विनंती फेटाळून लावली होती.
तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महानगरपालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांची बदली करावीच लागेल, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र राज्य सरकारने त्यावर काहीही कारवाई न करता पुन्हा ही बदली रोखण्यासाठी पत्र लिहिले होते. ती मागणी फेटाळून राज्य सरकारने आता थेट चहल यांना पदावरून हटवले आहे.
अश्विनी भिडे, पी वेलारासू यांच्याही बदलीचे आदेश
मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबलसिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व पी वेलारासू यांचीही बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने फेब्रुवारी अखेर दिले होते. मात्र त्यावरही काहीही निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. भिडे यांच्याकडे सागरी किनारा मार्गाची जबाबदारी आहे, तर वेलरासू यांच्याकडे रस्ते काँक्रिटीकरण, गोरेगाव मुलुंड जोडरस्ता, नि:क्षारीकरण प्रकल्प असे सगळेच महत्वाचे प्रकल्प आहेत. मात्र आता या दोन अतिरिक्त आयुक्तांची बदली कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – सांगलीसाठी आघाडीतून मैत्रीपूर्ण लढतीसाठी कॉंग्रेसचा दबाव
इकबाल सिंह चहल यांनी मे २०२० मध्ये करोना काळात टाळेबंदी असताना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यापूर्वीचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची तत्कालीन राज्य सरकारने तडकाफडकी बदली केली होती. टाळेबंदीच्या काळात चहल यांनी रात्रीच पदभार स्वीकारला होता.
चहल यांच्याविषयी….
२० जानेवारी १९६६ रोजी जन्मलेल्या चहल यांनी १२ वी परीक्षेत विज्ञान शाखेत ९६ टक्के गुणांसह राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इलेक्ट्रीकल कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक. (ऑनर) ही पदवी संपादीत केल्यानंतर चहल यांनी १९८९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करून सनदी सेवेमध्ये महाराष्ट्र तुकडीत प्रवेश केला.
भारतीय प्रशासकीय सेवेचा ३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या चहल यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्त आयुक्त, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव, धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाचे सचिव ही पदे सक्षमतेने सांभाळली. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना केंद्रीय गृह खात्याचे सहसचिव, केंद्रीय महिला व बालकल्याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च २०१३ ते मार्च २०१६ या कालावधीमध्ये सोपवली होती.
गृहनिर्माण व पुनर्वसन प्रकल्प, ग्रामविकास, दारिद्र्य निर्मुलन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास या विभागांमध्ये भरीव योगदान दिलेल्या चहल यांनी जलसंपदा खात्यात केलेल्या कामगिरी आधारे जानेवारी २०१८ मध्ये महाराष्ट्राला उत्कृष्ट जलसिंचन व्यवस्थापनाचा केंद्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या नेतृत्वात ‘सेतू’ केंद्राच्या यशस्वी कामगिरीबदृल राजीव गांधी प्रगती पुरस्कार, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स पुरस्कार २००२ देखील मिळाला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कार देखील मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मुंबई मॅरेथॉनमध्ये २००४ ते २०१८ पर्यंत सलग २१ किमी अंतराच्या हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणारे धावपटू म्हणूनदेखील त्यांची वेगळी ओळख आहे.