मुंबई : पावसाळ्यात जीर्ण इमारती, दरडप्रवण क्षेत्र आणि सखलभागात पाणी साचून आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास सर्व संबंधित आपत्कालीन यंत्रणांनी सज्ज रहावे, बचाव आणि मदत कार्य पोहोचवताना परस्परांमध्ये समन्वय राखावा, या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने पुढाकार घेतला आहे. दोन दिवस संबंधित यंत्रणांना एकत्र आणून विविध ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. शुक्रवारी मुंबईतील १०५ पैकी काही ठिकाणांची पाहणी करण्यात आली. उर्वरित ठिकाणांची शनिवारी पाहणी करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय लष्कर (आर्मी), भारतीय नौदल (नेव्ही), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे (एनडीआरएफ) जवान, महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, मुंबई अग्निशमन दल, महानगरपालिका विभाग कार्यालय आदींचे अधिकारी आणि कर्मचारी या पाहणीत सहभागी झाले होते. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती उद्भवल्यास आव्हानात्मक ठिकाणी मदतकार्य पोहचविण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, आपत्तीत अडकलेल्या नागरिकांची सुखरूप आणि तात्काळ सुटका कशी करता येईल, हा पाहणी करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा…जम्बो ब्लॉक काळात घरून काम करण्याची मुभा, ऑफिसमध्ये राहण्याची दक्षता

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीसंदर्भात गेल्या आठवड्यात २३ मे रोजी महानगरपालिकेत सर्व यंत्रणांची बैठक झाली होती. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामार्फत विविध यंत्रणांशी पावसाळापूर्व तयारीसाठी समन्वय राखला जात असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर, वांद्रे, अंधेरी, मुलुंड, बोरिवली, मालाड आदी परिसरांमध्ये शुक्रवारी पाहणी करण्यात आली.

हेही वाचा…कार्यालय गाठण्यासाठी एनएमएमटी, एसटीच्या बसचा पर्याय; बसमध्ये प्रवाशांची गर्दी

मुंबईतील चिंचोळ्या व घनदाट वस्तीच्या भागात मदतकार्य पोहोचविताना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, तसेच आपत्कालीन स्थितीत मदत पोहोचवण्यासाठी जवळचे आणि सुटसुटीत मार्ग कोणते, मदत कार्यासाठी वाहनांचे मार्ग कसे निवडायचे, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या यंत्रणेची सज्जता आदींची चाचपणी या पाहणीतून करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation conducts pre monsoon emergency readiness inspections across 105 mumbai locations mumbai print news psg