सहा तास पाऊस पडला तरी पाणी साचणार नाही

मुंबई : सांताक्रूझ पूर्व – पश्चिम वाहतुकीसाठी दुवा असणाऱ्या मिलन भूयारी मार्ग अर्थात मिलन सब-वेच्या सखल भागात पावसाचे पाणी साचण्यापासून दिलासा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने भूमिगत पाणी साठवण टाकी बांधली आहे. सुमारे ३ कोटी लिटर क्षमतेची ही टाकी संपूर्ण भरण्यासाठी २ पंप व सोबत एक जलवाहिनी, तर टाकीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी अतिरिक्त एक पंप अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल सहा तासांपर्यंतचा पाणीसाठा या भूमिगत टाकीमध्ये करता येणार आहे.

मुंबईत जोरदार पाऊस पडू लागताच सखलभागात पाणी साचते. त्यावर तोडगा म्हणून अशा भागांमध्ये विविध प्रकल्प हाती घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विविध उयाययोजना केल्या आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या परिसरांमध्ये पाणी साठवण करणाऱ्या टाक्यांच्या ठिकाणी क्षमतावाढीसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यापैकी मिलन सब-वे भूमिगत पाणी साठवण टाकी हा एक प्रकल्प आहे.

हेही वाचा >>> उघडी मॅनहोल्स सुरक्षित करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची; जबाबदारीची उच्च न्यायालयाकडून महानगरपालिकेला आठवण

मिलन सब-वे हा अत्यंत सखलभाग असल्याने तेथे दरवर्षी पावसाचे पाणी साचून नागरिकांची गैरसोय होत होती. मात्र महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ही समस्या लक्षात घेऊन या ठिकाणी भूमिगत पाणी साठवण टाकीची उभारणी केली आहे. सुमारे ३ कोटी लिटर क्षमतेच्या या टाकीमध्ये सहा तासांपर्यंत पाणी साठवण्याची क्षमता आहे. सध्या गुरूत्वाकर्षणाने या ठिकाणी ८५ टक्के पाणी साठवणे शक्य होत होते. अतिरिक्त १५ टक्के क्षमता उपयोगात येण्यासाठी या ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी आणि दोन पाणी उपसा करणारे ३००० क्युबिक मीटर क्षमतेचे पंप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच टाकीतील पाणी लवकरात लवकर उपसण्यासाठी अतिरिक्त एका पंपाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे भूमिगत टाकीची क्षमता वाढविणे शक्य होईल, अशी माहिती उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली. मिलन सब-वे पाणी साठवणूक टाकीचे दोन पंप सब-वेच्या ठिकाणी पाणी उपसा करून टाकी पूर्ण क्षमतेने भरेल अशा पद्धतीने बसविण्यात येणार आहे. तर समुद्राला ओहोटी असताना, टाकीतील पाण्याचा उपसा करता यावा यासाठी अतिरिक्त एक पंप बसविण्यात येणार आहे. हे उपसा केलेले पाणी इर्ला नाला येथे सोडण्यात येईल, अशी माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता विभास आचरेकर यांनी दिली.

Story img Loader