मुंबई: रस्त्यावर कुठेही रात्रीच्यावेळी डेब्रीज टाकून पळणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पालिकेने आता डेब्रीज ऑन कॉल या सेवेचे अद्ययावतीकरण केले आहे. घरगुती व लहान स्तरावरील राडारोडा वाहून नेणारी ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा आता ऑनलाईन स्वरुपात देण्यात येणार आहे. संकलित केलेल्या राडारोड्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. ५०० किलोग्रॅमपर्यंतची डेब्रीज संकलन सेवा मोफत असेल तर त्यावरील संकलनासाठी माफक दर ठेवण्यात येणार आहेत.
मुंबईतील घरगुतीस्तरावरील बांधकाम आणि पाडकाम यातून निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) उचलून वाहून नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘डेब्रीज ऑन कॉल’ ही सेवा सन २०१४ पासून सुरू केली. मात्र ही सुविधा पूर्ण क्षमतेने चालवली जात नव्हती. घरगुती तसेच लहान स्तरांवरील बांधकाम, पाडकाम, दुरुस्तीची कामे यातून निर्माण होणारे डेब्रीज संकलन करुन वाहून नेण्यासाठी ही सेवा माफक दरात कार्यरत आहे. रस्त्यावर तसेच इतरत्र टाकून देण्यात येणारे डेब्रीजचे प्रकार टाळण्यासाठी ही सुविधा आता अधिक व्यापक करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
हेही वाचा >>>एनआयएचे ८ राज्यांमध्ये १९ ठिकाणी छापे; राज्यातील अमरावती, संभाजी नगर व भिवंडीचा समावेश
घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणा-या डेब्रीजचे अधिकाधिक संकलन व्हावे, त्याचप्रमाणे रस्त्यांच्या कडेला व इतरत्र टाकून देण्यात येणा-या अनधिकृत डेब्रीजचे प्रकार रोखता यावेत तसेच शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन सदर डेब्रीज पुनर्प्रक्रिया करुन वापर करण्याकरीता उपलब्ध व्हावे, यासाठी ही सेवा अधिक सुलभ, वेगवान व काळानुरुप ऑनलाईन पर्यायांसह उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली होती. याबाबतचा अभ्यास करुन लोकाभिमुख, अधिक कार्यक्षम व्यवस्था उभी करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाने ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेचा लोकाभिमुख विस्तार केला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.
महानगरपालिकेकडे मागणी प्राप्त झाल्यानंतर संबंधित कनिष्ठ पर्यवेक्षक प्रत्यक्ष ठिकाणी भेट देवून पाहणी करुन खातरजमा करतील. तसेच डेब्रीज नेण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीचा अंदाज घेतील. त्यांच्याकडून मागणी मंजूर होवून लागू असणारे शुल्क ऍपद्वारे कळवले जाईल. तसेच, मागणी मंजूर केल्याचे संबंधित नागरिकांस मोबाईल ऍपवर, व्हॉटस्ऍपवर कळवले जाईल. लागू असलेले शुल्क भरणा केल्यानंतर ४८ तासांच्या आतमध्ये डेब्रीज संकलन करुन वाहून नेण्यात येईल. ५०० किलोग्रॅमपर्यंतच्या डेब्रीजसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यापुढील डेब्रीजसाठी देखील अत्यंत माफक दर आकारले जाणार आहेत, अशी माहिती उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
हेही वाचा >>>देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ‘मायबीएमसी’ या मोबाईल ऍपमध्ये नागरिकांना ‘डेब्रीज ऑन कॉल’ चा पर्याय लवकरच उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये मुंबई शहर व पूर्व उपनगरांसाठी एक तर पश्चिम उपनगरांसाठी दुसरा असे दोन पर्याय आढळतील. योग्य पर्याय निवडल्यावर ‘डेब्रीज ऑन कॉल’ शी संबंधित स्वतंत्र मोबाईल ऍप इन्स्टॉल करता येईल. त्या ऍपमध्ये सर्व माहिती भरल्यानंतर महानगरपाालिकेकडे मागणीची नोंद होईल. सेवेसाठी रक्कम देखील ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्याची सुविधा नागरिकांना मिळणार आहे. त्याची पावतीही ऍपमध्ये त्याचप्रमाणे व्हॉटस्ऍपद्वारे दिली जाणार आहे.
गोळा केलेल्या राडोरोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने पुढील तब्बल २० वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदार नियुक्त केले आहेत. राडारोडा संकलन, वाहतूक, त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे, त्यासाठी जागा मिळवून प्रकल्प उभारणे, मनुष्यबळ व संयंत्रे इत्यादी यंत्रणा उभी करणे, या सर्व बाबींची जबाबदारी ही कंत्राटदारावरच सोपविण्यात आली आहे.
टोल फ्री क्रमांक
‘डेब्रीज ऑन कॉल’ करिता मुंबई शहर व पूर्व उपनगरांसाठी १८००-२०२-६३६४ आणि पश्चिम उपनगरांसाठी १८००-२१०-९९७६ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. हा टोल फ्री क्रमांक सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत उपलब्ध करुन दिला आहे. तर, ‘मायबीएमसी’ मोबाईल ऍपच्या माध्यमातून लवकरच ऑनलाईन पर्याय कार्यान्वित करण्यात येणार आहे जो २४ तास उपलब्ध असेल. राडारोडा संकलनापासून ते प्रक्रियेपर्यत ऑनलाईन प्रणालीद्वारे हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने ही सेवा अधिक सुलभ, जलद होणार आहे. संपूर्ण भारतातील अशा प्रकारचा ‘ऑनलाईन’ सेवा असलेला हा पहिलाच उपक्रम आहे. वॉर्डनिहाय क्रमांकाऐवजी या दोन क्रमांकांवरुन संपूर्ण मुंबई महानगरातील नागरिकांना सेवा पुरवली जाईल.