मुंबई : पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून यंदाही नालेसफाई करण्यात येणार असून यंदाच्या नालेसफाईत मुंबई महापालिकेने महत्त्वपूर्ण अट घातली आहे. मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारे, मिठी नदी यांच्यामधील गाळ काढण्यासाठी जानेवारी अखेरीस निविदा मागवण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या कडेच्या भूमिगत गटारातील गाळ काढला की नाही याचेही सीसी टीव्ही चित्रिकरण कंत्राटदाराला करावे लागणार आहे. त्यामुळे यंदा रस्त्यावर पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जातात. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळ्याआधी काढला जातो. तर १५ टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान आणि १० टक्के पावसाळ्यानंतर काढला जातो. ही कामे दरवर्षी मार्च महिन्यात सुरू होतात. त्याकरीता डिसेंबर महिन्यात निविदा मागवल्या जातात. यंदा मात्र या निविदांना उशीर झाला असून पुढील दोन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून एप्रिलपासून नालेसफाईच्या कामांना सुरूवात करावी लागणार आहे.
नालेसफाईच्या कामांसाठी यावर्षी एकूण २६ विविध निविदा परिमंडळाप्रमाणे मागवण्यात आल्या आहेत. नालेसफाईसाठी दरवर्षी एका वर्षाकरीता निविदा मागवल्या जातात. यंदा मात्र प्रथमच दोन वर्षांसाठी निविदा मागवल्या जात आहेत. गेल्यावर्षी नालेसफाईसाठी पालिका प्रशासनाने २५० कोटी रुपये खर्च केले होते. यंदा दोन वर्षांसाठी मिळून ५८० कोटी रुपयांपर्यंत हा खर्च जाणार आहे. प्रथमच दोन वर्षांसाठी कंत्राटदार नेमण्याकरीता निविदा मागवण्यात आल्या आहेत. या कामांचा खर्च ५४० कोटी होणार आहे. दरवर्षी मिठी नदीसाठी दोन वर्षांचे कंत्राट दिले जाते. मिठी नदीचे दोन वर्षांचे कंत्राटही संपले असून यंदा सर्व नाले व मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी दोन वर्षांचे कंत्राट दिले जाणार आहे.
यावर्षीच्या नालेसफाईत पालिका प्रशासनाने महत्त्वपूर्ण अट समाविष्ट केली आहे. शंभर टक्के नालेसफाईचा दावा पालिका प्रशासनाने केला तरी अनेकदा मुंबईच्या रस्त्यावर पाणी साचते. रस्त्याच्या कडेच्या भूमिगत गटारातील गाळ वरवर काढला जातो. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई होते. त्यामुळे दर सहा मीटर अंतरावर असलेली ही गटारे आतून स्वच्छ झाली की नाही, पाण्याचा प्रवाह योग्य प्रकारे जाऊ शकतो का हे आतापर्यंत पाहिले जात नव्हते. मात्र यापुढे कंत्राटदाराला भूमिगत गटारातील गाळ काढल्याचे सीसी टीव्ही चित्रिकरण करावे लागणार आहे. गाळ काढण्यापूर्वी व गाळ काढल्यानंतरचे चित्रीकरण द्यावे लागणार आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या भूमिगत गटारांची प्रवेशद्वारे लहान असतात. या प्रवेशद्वारांच्या जाळ्यांवर कचरा टाकला जातो. त्यामुळे ही गटारे तुंबलेली असतात. पावसाळ्याच्या आधी गटारांमधील कचरा साफ करावा लागतो. नाहीतर पावसाचे पाणी वाहून न गेल्यामुळे परिसरात पाणी साचते. गटारांची प्रवेशद्वारे लहान असल्यामुळे केवळ त्याच्या आजूबाजूचाच कचरा स्वच्छ केला जातो. परंतु दोन प्रवेशद्वारांच्या मधला संपूर्ण मार्ग स्वच्छ झाला की नाही हे पाहिले जात नव्हते. त्यामुळे मोठे नाले साफ झाले तरी भूमिगत गटारे साफ नसतील तर पावसाचे पाणी नाल्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याकरीता भूमिगत गटारांच्या खाली सीसी टीव्ही कॅमरे टाकून गटारे स्वच्छ झाले की नाही याची पाहणी यंदा केली जाणार आहे. त्याकरीता ही अट घालण्यात आल्याची माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
नालेसफाई अंदाजित खर्च
शहर भाग – ३९.४५ कोटी
पूर्व उपनगरे – १४८.३९ कोटी
पश्चिम उपनगरे – २५७.३५ कोटी
मिठी नदी – ९६ कोटी
मुंबईतील मोठे नाले, लहान नाले तसेच मिठी नदी यांची एकूण लांबी सुमारे ६८९ किमी आहे. मुंबई व उपनगरात ३०९ मोठे नाले, १५०८ लहान नाले आहेत. मुंबईत सुमारे दोन हजार किमी लांबीचे रस्त्याचे जाळे आहे. त्यामुळे तितकीच रस्त्याच्या कडेला असलेली २००० किमी लांबीची भूमिगत गटारे आहेत. ती यंदा स्वच्छ होतील अशी अपेक्षा आहे.