लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ताडदेव येथील बेलासिस पुलालगतच्या मासळी बाजारात मासे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी उभारण्यात आलेले शौचालय महानगरपालिका प्रशासनाने गुरुवारी जमीनदोस्त केले. तसेच, मंगळवारी बाजारातील वीज जोडणी कापण्याचाही पालिकेने प्रयत्न केला. या प्रकारामुळे कोळी महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तसेच, मासळी विक्रीचा व्यवसाय कुठल्याही समस्येविना सुरू राहावा, यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीतर्फे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. विविध मागण्यांसाठी येत्या १० डिसेंबर रोजी पालिकेच्या डी विभाग कार्यालयावर जन-आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय कोळी बांधवानी घेतला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बेलासिस पुलालगतच्या मासळी बाजारात अनेक महिला मासे विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. मासे विक्री गाळ्याबरोबर या ठिकाणी इतर दुकानेही होती. महापालिकेने या दुकानदारांचे इतर ठिकाणी पुनर्वसन केले. मात्र, मासे विक्री व्यवसायाच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाने कोळी महिलांना कोणतेही आश्वासन दिलेले नाही. दरम्यान, कुठलीही सूचना किंवा नोटिसीविना पालिका प्रशासनाने गुरुवारी सकाळी बाजारातील महिलांचे शौचालय जमीनदोस्त केले, असा आरोप मासळी विक्रेत्यांकडून केला जात आहे. तसेच, वारंवार पालिका कर्मचाऱ्यांमार्फत गाळे तोडण्याची धमकी दिली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना पुन्हा समन्स, अभिनेत्री गहना वशिष्ठलाही समन्स
मंगळवारी बाजारातील वीज जोडणी कापण्यासाठी पालिकेचे कर्मचारी येताच त्यांना कोळी महिलांनी घेराव घातला. पालिकेच्या या कारभाराविरोधात येत्या १० डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय कोळी बांधवांनी घेतला आहे. बेलासिस पुलालगत मासळी विक्री करणाऱ्या कोळी महिलांचे पुनर्वसन ताडदेव परिसरात करावे, महिलांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांचे गाळे शाबूत ठेवावे, महिलांचे शौचालय जमीनदोस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, बाजारात मोबाइल शौचालयाची व्यवस्था करावी आदी विविध मागण्यांसाठी हा मार्चा काढण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कोळी महिला मासे विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या बाजारातील मासे विक्रेत्या वगळून इतर दुकानदारांचे पुनर्वसन करणे हा कोळी महिलांवर अन्याय आहे. गाळे तोडण्याची धमकी, तसेच सूचना न देताच शौचालय तोडल्यामुळे मच्छिमार महिला संतप्त झाल्या आहेत. पालिकेच्या या कृतीविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी दिली.