मुंबई : दहिसर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजेश येरूणकर यांनी मतमोजणी आणि ईव्हीएम यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या सर्व आरोपांचे खंडन केले. महानगरपालिकेने ‘एक्स’ समाजमाध्यमावरून मंगळवारी स्पष्टीकरण देत संबंधित ईव्हीएम यंत्रात त्रुटी नसल्याचा दावा केला. तसेच, ‘फॉर्म १७ सी’मधील मतमोजणीत तफावत नसल्याचेही स्पष्ट केले.

दहिसर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार मनीषा चौधरी, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) माजी आमदार विनोद घोसाळकर आणि मनसेचे राजेश येरूणकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दरम्यान, राजेश येरूणकर यांना निवडणुकीत एकूण पाच हजार ४५६ मते मिळाली. मात्र, ज्या परिसरात ते राहतात तेथील मतदारयादीतील मतदान केंद्रावर त्यांना एक हजार मतदारांपैकी केवळ दोनच मते मिळाली. या मतदारसंघातून मनीषा चौधरी या तिसऱ्यांदा निवडून आल्या असून त्यांना ५८ हजार ५८७ मते मिळाली. तर, दुसऱ्या क्रमांकावरील घोसाळकर यांना ५४ हजार २५८ मते मिळाली. मात्र, स्वतःच्या मतदारयादीतील मतदान केंद्रावर केवळ दोन मते मिळाल्यामुळे येरुणकर यांनी यंत्रणेवर आक्षेप घेऊन विविध आरोप केले. याबाबतची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात फिरू लागली आहे. दोन मते मिळाल्याचे समजताच त्यांनी मतमोजणी केंद्रावरच याबाबत आक्षेप घेतला होता व त्याबाबतचा अर्जही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी काही ऐकून घेतले नाही. त्यामुळे आम्ही तिथून बाहेर पडलो, असे येरुणकर यांनी सांगितले.

हेही वाचा : भटक्या श्वानाचा डोळा निकामी करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

माझ्या कुटुंबात मी, माझी पत्नी, मुलगी, आई असे चार मतदार आहोत. मग माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही मला मतदान केले नाही का, असा सवाल येरूणकर यांनी केला. दरम्यान, मतमोजणीच्या वेळी एका मतदान यंत्राच्या तीन सिलपैकी एकच सिल होते. काही यंत्रांची बॅटरी उतरलेली होती, तर काही यंत्राची बॅटरी पूर्ण ९९ टक्के होती हे कसे काय, असेही प्रश्न येरूणकर यांनी उपस्थित केले आहेत.

येरुणकर यांच्या आरोपामुळे मतमोजणी प्रक्रिया व ईव्हीएम यंत्रणेबाबतच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत असल्याचे लक्षात येताच मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी ‘एक्स’ समाजमाध्यमवरून सर्व आरोपांचे खंडन केले. महापालिकेने १७ सी आणि ईव्हीएम यंत्र यातील मतदानाची आकडेवारी आणि संयंत्राचा क्रमांक न जुळणे; मतमोजणीच्या वेळी कंट्रोल युनिटची ९९ टक्के बॅटरी, मतदान यंत्राचे सील, उमेदवारातील कुटुंब संख्या आणि त्या तुलनेत उमेदवाराला फक्त दोन मते मिळाले असल्याची तक्रार आदी आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. १७ सी आणि ईव्हीएम यंत्र यामधील एकूण मतदानाची आकडेवारी आणि यंत्राचा क्रमांक तंतोतंत जुळत आहे. १७ सीची एक प्रत मतदानाच्या दिवशी सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींना देण्यात आली आहे. तसेच, मतदान व मतमोजणीच्या दिवशी कोणतीही लेखी तक्रार दहिसर विधानसभा मतदारसंघ येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेली नसल्याचे पालिकेने नमूद केले. तसेच, मतमोजणी यंत्राला योग्यरीत्या सील लावण्यात आले होते. तसेच, सील उघडल्यानंतर १७ सी आणि ईव्हीएम यंत्र यावरील मतदानाची आकडेवारी तंतोतंत जुळल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

हेही वाचा : नातेसंबंधांत दुरावा आल्यानेच बलात्काराची तक्रार, वकिलाविरोधातील गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

उमेदवार व त्यांचे कुटुंब यांचा समावेश मतदारयादी भाग क्रमांक १६३ मध्ये असून मतदानाच्या दिवशी उमेदवारास प्रत्यक्षात ५३ मते मिळाल्याचे फॉर्म १७ – सी भाग २ मध्ये दिसून येत असल्याने येरूणकर यांचा केवळ दोनच मते मिळाल्याचा आरोप पालिकेने खोडून काढला. दरम्यान, कंट्रोल युनिटमध्ये २ हजार वॅट्स क्षमतेची उत्तम दर्जाची बॅटरी वापरण्यात आली आहे. एखाद्या मतदान केंद्रावर १ हजारांहून कमी मतदान झाले, तर यंत्राचा साहजिकच कमी वापर होतो. त्यामुळे वापरानंतरही यंत्राची बॅटरी ९९ टक्के दिसते, असेही महापालिकेने नमूद करत येरुणकरांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.