मुंबई : शहर आणि उपनगरात सुरू असलेली रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंत्राटदारांना आता १० जूनची अंतिम मुदत दिली आहे. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर रस्ता रोधक (बॅरिकेड्स), बांधकाम साहित्य दिसणार नाही याची खबरदारी घ्यावी, पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते वाहतूक योग्य करावे, असे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. संपूर्ण पावसाळ्यात कोणत्याही यंत्रणेला रस्ते खोदकाम करण्याची परवानगी देता येणार नाही. केवळ वीज, गॅस, पाणी यांसारख्या अत्यावश्यक गरजांच्या कामांसाठी गरजेनुसारच रस्ते खोदकामाची परवानगी देण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात मुंबईकरांना रस्त्यांच्या कामांमुळे किंवा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. मुंबई महानगरातील पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून रस्त्यांच्या कामांशी संबंधित बाबींचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी वरील सूचना दिल्या. पावसामुळे रस्त्यांवर तयार होणाऱ्या खड्ड्यांच्या तक्रारींचा निपटारा शक्यतो २४ तासांमध्ये करावा, पावसाळ्यात मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते विभाग आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा सक्षमपणे आणि एकसंघपणे कार्यरत आहे, याचा अनुभव आपल्या कामकाजातून नागरिकांना आला पाहिजे, त्यासाठी सर्व संयंत्रे आणि साहित्याची उपलब्धतता राहील याची खातरजमा करा, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा : मुंबईत २३९ ‘आपला दवाखाना’ सुरू, आतापर्यंत ५७ लाख रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

पावसाळ्यात कोणत्याही यंत्रणेला रस्ते खोदकाम करण्याची परवानगी देता येणार नाही. मात्र वीज, गॅस, पाणी यांसारख्या अत्यावश्यक गरजांच्या कामांसाठी आवश्यकतेनुसारच रस्ते खोदकामाची परवानगी द्यावी. संबंधित यंत्रणेने त्यांची कामे पूर्ण केल्यानंतर खड्डा बुजवला नसल्याचे आढळल्यास महानगरपालिकेने स्वतःहून तो बुजवावा आणि दुरूस्तीचा खर्च संबंधित यंत्रणेकडून घ्यावा, अशी सूचनाही बांगर यांनी केली.

खड्डे चौकोनी आकारात बुजवावे

रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण ७२ मास्टिक कुकर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व मास्टिक कुकर संयंत्रांवर जीपीएस लावून त्याआधारे संयंत्रांच्या उपलब्धततेवर लक्ष ठेवले जाईल. त्यासाठी डॅशबोर्डची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण मुंबईत जास्त पावसाच्या कालावधीत रस्त्यांवरील खड्डे बुजविताना, प्राप्त तक्रारी लक्षात घेऊन कमीत कमी वेळेत खड्डे बुजविता येतील अशा रितीने मार्गांचा क्रम आखावा, खड्डे बुजविताना चौकोनी आकारात मास्टिकद्वारे खड्डे व्यवस्थित भरावेत, अशा सूचना बांगर यांनी केल्या. तसेच खड्डा वेड्यावाकड्या आकारात भरला जाणारा नाही यादृष्टीने खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : पुनर्मूल्यांकनाचा निकाल रखडला; मात्र ‘एटीकेटी’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेचे नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात

मास्टिक कुकरवर जीपीएस लावून त्याचा डॅशबोर्ड तयार होणार

सर्व विभागातील खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्टिक मिश्रणासाठीचे कुकर हे सुस्थितीत, तसेच वापरासाठी उपलब्ध असावेत, याची खातरजमा विभागीय पातळीवर करावी. तसेच सर्व मास्टिक कुकरला लवकरात लवकर जीपीएस यंत्रणा बसवण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही बांगर यांनी दिल्या. त्याचप्रमाणे सर्व संबंधित कंत्राटदारांना सूचना करून मास्टिकचे उत्पादन व उपलब्धता, आवश्यक तेव्हा व आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होईल, यासाठी आतापासूनच खातरजमा करून ठेवावी. तसेच खड्डे बुजवण्याची कामे करताना विविध विभागांनी आपापसात समन्वय व नियोजन राखावे, असेही त्यांनी सांगितले.

इथे करा खड्ड्यांच्या तक्रारी

मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी नागरी मदत सेवा क्रमांक १९१६, समाजमाध्यमे, व्हॉट्स ॲप चॅटबॉट, पॉटहोल फिक्सिंग मोबाइल ॲप तसेच दुय्यम अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक इत्यादी विविध पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सर्व माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर, तसेच विभागनिहाय शोधण्यात आलेले खड्डे बुजवण्याची कार्यवाही शक्यतो २४ तासात पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा : मुंबई: महाराष्ट्र सदन प्रकरणातील झोपडीवासीयांची इमारत धोकादायक घोषित! गच्चीवर बुलडोझर नेऊन इमारतीचे पाडकाम

संपूर्ण मुंबईत १४३ ठिकाणी रस्त्यांची कामे

मुंबई महानगरात सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश कामे पूर्णत्वाकडे आहेत, तर काही कामे प्रगतिपथावर आहेत. यामध्ये मुंबई शहर भागात २४ ठिकाणी, तसेच पूर्व उपनगरात ३२ ठिकाणी, तर पश्चिम उपनगरामध्ये ८७ ठिकाणी कामे सुरू आहेत. यापैकी बहुतांश रस्ते ७ जूनपासून वाहतूकीसाठी उपलब्ध होतील. तर उर्वरित काही रस्ते १० जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुले होतील, अशी माहिती बांगर यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation directs administration to complete road works till 10th june mumbai print news css