Brihanmumbai Municipal Corporation Budget 2025 : महानगरपालिका प्रशासनाने शिक्षण विभागासाठी २०२५ – २६ या आर्थिक वर्षाचा ३९५५.६४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शिक्षणाच्या अर्थसंकल्पात ४५७.८३ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२४ – २५ मध्ये ३४९७.८२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला होता. येत्या आर्थिक वर्षात महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना विविध सुविधा देण्याचा महापालिकेचा मानस असून त्यासाठी लाखो रुपयांची तरतूद केली आहे. तसेच, नवनवीन योजना व प्रकल्प राबविण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिकेने आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब पुरविण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मध्ये इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या ३२,६५९ टॅबमध्ये ‘गेमफील्ड लर्निंग अँप’ ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. विद्यार्थी व शिक्षकांसाठी शब्दकोश, खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा, ई – वाचनालय, डिजिटल क्लासरूम, कौशल्य विकास केंद्र, किचन गार्डन आदींमधून विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षणाला आणखी बळकटी देण्याचा पालिकेचा मानस आहे. शाळेचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महापालिकेचे विविध प्रयत्न सुरु असून शाळांची दुरुस्ती व दर्जोन्नतीसाठीची ६६ कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच, पुनर्बांधणी व नवीन बांधकामांची एकूण ४५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित ३६ कामे आगामी वर्षात पूर्ण करण्याचे पालिकेने ठरविले आहे. या कामांसाठी तब्बल ३००.७१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने आगामी वर्षात ११२ संगणक प्रयोगशाळा अद्ययावत करण्याचा संकल्प सोडला असून प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी मिळून एकूण ७.२३ कोटींची तरतूद केली आहे. पालिकेने शहर विभागानंतर आता उपनगरांतील शालेय इमारतींमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आर्थिक वर्ष २०२५ – २६ मध्ये १३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, महानगरपालिका, महाराष्ट्र शासन व जिल्हा नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही उपनगरांतील पालिका शाळांमध्ये किचन गार्डन संकल्पना राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पूर्वीपासून सुरु असलेल्या कल्याणकारी योजना व उपक्रमांना आगामी वर्षातही प्राधान्य देण्यात आले आहे. महापालिकेने शालोपयोगी वस्तूंचा मोफत पुरवठा, मुलींचा उपस्थिती भत्ता, अत्याधुनिक बैठक व्यवस्था, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना आदींसाठीही भरीव निधीची तरतूद केली आहे. आगामी वर्षात महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याबाबत ई – निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यासाठी ४९ लाख रुपये प्रास्ताविण्यात आले आहेत.

राज्य शासनाकडून यंदाही थकबाकी वसूल करण्यात महापालिकेला अपयश

माध्यमिक शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार ४९ अनुदानित महापालिकेच्या माध्यमिक शाळेतीळ कार्यरत कर्मचारी वर्गाच्या वेतनावरील १०० टक्के खर्चाची प्रतिपूर्ती शासनाकडून प्राप्त होते. यासाठी आगामी वर्षात २२३.७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य शासनाकडून महानगरपालिकेला मार्च २०२४ पर्यंत प्राथमिक शिक्षणाच्या खर्चापोटी ५,२३२.६१ कोटी रुपये येणे बाकी होते. तसेच, माध्यमिक शिक्षणाच्या खर्चापोटी १,३४८.४७ कोटी अशी एकूण मिळून ६,५८१. ०८ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात महापालिकेला यंदाही अपयश आले आहे. थकबाकी वसुलीसाठी पालिकेमार्फत शासनाकडे सातत्याने पाठपुरवठा सुरु आहे. गतवर्षीही राज्य शासनाकडून महापालिकेला ५,९४६.३ कोटी रुपये येणे बाकी होते.