मुंबई : अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुंबई महापालिकेचे पदनिर्देशित अधिकारी मंदार तारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन व्यक्तींना एसीबीने अटक केली आहे. आरोपींना ७५ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

मुख्य आरोपी मंदार अशोक तारी घाटकोपर (पूर्वे) येथील महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयात पदनिर्देशिक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मुंबई एसीबीने याप्रकरणात मोहम्मद शहजादा यासीन शाह (३३) आणि प्रतीक विजय पिसे (३५) यांना मंगळवारी तक्रारदाराकडून ७५ लाख रुपये लाच म्हणून स्वीकारताना अटक केली.

हेही वाचा : २० हजार संगणक परिचालकांची सेवा संपुष्टात, नवीन नियुक्तीबाबत साशंकता, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांची चार मजली इमारत आहे. त्यातील दोन मजले अनधिकृत असल्याचे त्यावर निष्कासन कारवाई न करण्यासाठी सह कार्य करण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी तारी यांनी तक्रारदाराकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने याप्रकरणी ३१ जुलै रोजी एसीबीकडे धाव घेतली. याबाबत एसीबीकडून करण्यात आलेल्या पडताळणीत तक्रारदाराने दोन कोटी रुपयांची मागणी करून पहिला हफ्ता ७५ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने मंगळवारी सापळा रचला होता. त्यावेळी पिसे व शहा या दोघांना ७५ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. याप्रकरणी एसीबीने तारी आणि अटक केलेल्या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एसीबी अधिक तपास करीत आहे.

Story img Loader