मुंबई : मराठा सर्वेक्षणासाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी जातीची विचारणा केल्यावरून अभिनेता पुष्कर जोग यांनी समाजमाध्यमांवर आक्षपार्ह विधान केले असून त्यावरून पालिका कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुष्कर जोग यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे. तर राज्य मागासवर्ग आयोग आणि पालिका प्रशासन यांनी जोग यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अन्य एका संघटनेने केली आहे.
मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी गेलेल्या महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याने जात विचारली म्हणून मराठी चित्रपटसुष्टीतील अभिनेता पुष्कर जोक यांनी समाजमाध्यमांवरून संताप व्यक्त केला. ‘प्रश्न विचारणारी कर्मचारी महिला नसती तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपा करून हा प्रश्न मला पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील’ असे त्यांनी समाजमाध्यमांवर नमुद केले होते. या मजकूरावरून पुष्कर जोग यांच्याविरोधात पालिका कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी जोग यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा : एटीएम यंत्रावर चिकटपट्टी चिकटवून चोरी, मालाडमधून दोन संशयितांना पकडले
दरम्यान, जोग यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून हा मजकूर हटवला आहे. मात्र पालिका कर्मचारी आक्रमक झाले असून जोग यांनी कर्मचाऱ्यांची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, इशाराही कामगार संघटनांनी दिला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाणारे पुष्कर जोग आता अडचणीत आले आहेत. मुंबईत मराठा आरक्षणविषयक सर्वेक्षण सुरू असून यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन, नागरिकांची माहिती जमा करीत आहेत. मात्र त्यात जोग यांनी असे आक्षेपार्ह विधान केल्यामुळे आता इतर नागरिकही त्याचे अनुकरण करतील, अशी भीती कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा : दुबईच्या चलनी नोटांऐवजी कोरे कागद देऊन चार लाखांची फसवणूक, दोन आरोपी अटकेत
पुष्कर जोग यांचे वक्तव्य गंभीरपणे घेऊन पालिका प्रशासन आणि राज्य मागासवर्ग आयोग यांनी जोग यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. कर्तव्याचे पालन करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दि म्युनिसिपल युनियनने पुष्कर जोग यांचा जाहीर निषेध केला आहे. या वक्तव्याबद्दल जोग यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही युनियनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.