मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध विभागातील चतुर्थ श्रेणी कामगारांनी २०१७ मध्ये रात्रशाळेत शिकून दहावीची परिक्षा दिली व चांगल्या गुणांनी ते उत्तीर्ण झाले. २३ कामगारांनी आपले दैनंदिन काम सांभाळून आपल्या घरच्या अडचणीतून वाट काढत डोंगरीच्या रात्रशाळेतून आपले शिक्षण पूर्ण केले. या २३ कामगारांच्या यशाची कहाणी लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
‘आता थांबायच नाय’ या नावाने हा झी स्टुडिओजचा चित्रपट येत असून आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त पार पडला.
हेही वाचा – मुंबई : विमानतळावरून साडेपाच कोटींचा गांजा जप्त, आरोपीला अटक
डोंगरी, पायधुनी या भागाचा समावेश असलेल्या महापालिकेच्या बी विभाग कार्यालयातील २३ चतुर्थश्रेणी कामगारांनी २०१७ मध्ये रात्रशाळेत प्रवेश घेऊन दहावीची परीक्षा दिली व ते चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले. या २३ कामगारांनी एक इतिहासच रचला. त्यांच्या या कामगिरीची त्यावेळी सर्व प्रसारमाध्यमांनी दखल घेतली होती. तसेच या कामगारांना पुढे पालिका प्रशासनात तृतीय श्रेणीत बढतीही मिळाली होती. या २३ कामगारांमध्ये दोन महिलांचाही समावेश होता. रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आदी विभागातील हे कामगार होते. यापैकी काही जण सफाई कामगार होते, काही जण पर्जन्य जलवाहिन्या विभागातील मनुष्यप्रवेशिकांवर काम करणारे होते. अशा चतुर्थ श्रेणी कामगारांनी शिक्षण सोडून अनेक वर्षे झालेली असतानाही दहावीची परीक्षा दिली व ते उत्तीर्ण झाले. कामगारांच्या या यशाची कहाणी पडद्यावर पाहता येणार आहे. झी स्टुडिओजचा हा चित्रपट असून निर्माते निधी परमार- हिरानंदानी आणि धरम वालिया हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ग्रॅन्ट रोड येथील पालिकेच्या गिल्डर टॅंक शाळेत चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. यावेळी निवृत्त सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरूरकर, घनकचरा विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर उपस्थित होते.
हेही वाचा – बहुस्तरीय चाचणी पद्धतीने नीट युजी परीक्षा घेण्याचा समितीचा अहवाल
२०१७ मध्ये वर्तमानपत्रात कर्मचाऱ्यांबद्दल बातमी वाचली, तेव्हाच मला ही कथा खूप प्रेरणादायी वाटली. गेली काही वर्षे मी या विषयावर काम करीत होतो. या २३ उत्तीर्ण कामगारांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्या अडचणी, त्यांचे जीवन मी समजून घेतले. त्यानंतर मी हा चित्रपट करत आहे. – धरम वालिया, चित्रपट निर्माता