मुंबई : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी मुंबई महापालिकेकडे आठ हजार ५०० कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. आधीच लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेले काही कर्मचारी अद्याप महापालिकेच्या सेवेत रूजू झालेले नाहीत. असे असताना आता विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेला कर्मचारी पाठवावे लागणार आहेत. या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील तीन दिवस निवडणुकीचे काम, तर तीन दिवस महापालिकेचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध सेवा-सुविधा आणि प्रशासकीय कामावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शिक्षकांना या कामातून वगळण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेची निवडणूक पार पडली असून आता विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सप्टेंबरमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विविध विभागांमधील तब्बल आठ हजार ५०० कमचाऱ्यांची मागणी शहर आणि उपगनरातील जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेकडे केली आहे. त्यानुसार मुंबई महापालिका प्रशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केले असून उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी सहा हजार ५०० कर्मचारी आणि शहर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी दोन हजार कर्मचारी पाठविण्यात येणार आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याच्या (बीएलओ) कर्तव्यासाठी हे कर्मचारी मागवण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या सेवा-सुविधा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : मुंबई: माटुंगा येथे रेल्वे रुळाला तडा, लोकलचे वेळापत्रक कोलमडले

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्य कामासाठी मुंबई महापालिकेतील मोठ्या संख्येने कर्मचारी घेण्यात आले होते. सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी सुमारे १० हजार ४०० कर्मचारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा क्षेत्रीय अधिकारी या कामासाठी तीन ते चार महिन्यांच्या कालावधीपासून गेले आहेत. महापालिकेच्या आरोग्य, शिक्षण, जलअभियंता अशा सर्वच विभागांतील कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी गेल्यामुळे महापालिकेच्या सर्व सेवांवर परिणाम झाला होता. लोकसभेची निवडणूक पार पडली. तरी या १० हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ ३० टक्के कर्मचारी कामावर हजर झाले होते. त्यामुळे महापालिकेने कामावर रुजू न झालेल्या कमचाऱ्यांचे वेतन रोखण्याचा निर्णय घेतला होता. तरीही अनेक कर्मचारी अद्याप महापालिकेच्या सेवेत रुजू झालेले नाहीत. या कर्मचाऱ्यांना पुन्हा निवडणूक कर्तव्यावर पाठवू नये असे स्पष्ट आदेशही प्रशासनाने जारी केले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील तीन दिवस म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवारी निवडणुकीची कामे करावी. तर सोमवार, मंगळवार आणि बुधवारी या कर्मचाऱ्यांनी महापालिकेतील आपल्या कार्यालयात उपस्थित राहून कामे करावी, असे महापालिका प्रशासनाने आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

हेही वाचा : मुंबई : लाटांच्या माऱ्यामुळे समुद्री भिंतीवरील पदपथ खचायला सुरुवात

घनकचरा विभागाचे सर्वाधिक कर्मचारी

निवडणुकीच्या कामासाठी चिटणीस विभाग, प्रमुख लेखा परिक्षक, आयुक्त कार्यालय, वित्त विभाग, सुरक्षा विभाग, मध्यवर्ती खरेदी खाते या विभागांसह रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, जल अभियंता, पाणीपुरवठा आदी विभागांमधील कर्मचारी मागवण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक सुमारे चार हजार ५०० कर्मचारी घनकचरा विभागातील आहेत.