मुंबई महानगरपालिकेने भरधाव वेगात वाहने चालविणाऱ्या चालकांना वेसण घालण्यासाठी, तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वरळी कोळीवाडा परिसरात काही दिवसात मोठ्ठे गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभे केले होते. मात्र या गतिरोधकांचा काही भाग उखडून रहिवाशांनी दुचाकीसाठी मार्ग मोकळा केला आहे. दरम्यान, गोल्फादेवी रस्त्यावरील चारही गतिरोधकांवर दुचाकी आदळत होत्या असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>मुंबई: पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी निश्चित केलेल्या जागेचा अखेर ई लिलाव

वरळी कोळीवाडा येथील गोल्फादेवी परिसरात एका रात्रीत चार गतिरोधक बांधण्यात आले होते. ५० ते ६० मीटर अंतरावर बांधण्यात आलेले हे गतिरोधक नियमानुसार नाहीत असा आरोप येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. वरळी गावातील रहिवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता हे गतिरोधक उभारण्यात आले असून त्यांचे बांधकाम करताना योग्य ती काळजी घेण्यात आलेली नाही, असाही आरोप रहिवाशांनी केला आहे. याप्रकरणी वरळीतील रहिवासी ॲड शरद कोळी यांनी महानगरपालिका प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात याबाब तक्रार केली आहे. मात्र प्रशासनाने पत्राची दखल न घेतल्यामुळे अखेर रहिवाशांनीच या गतिरोधकांचा मधला भाग तोडून दुचाकी जाण्या-येण्यासाठी जागा तयार केली आहे.

हेही वाचा >>>भारत-पाकिस्तान सामना अन् गोव्यातील सामना; चार्ल्स शोभराजला पकडणाऱ्या मधुकर झेंडेंचा आठवणींना उजाळा

हे गतिरोधक इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाहीत, असे ॲड. कोळी यांनी पत्रात म्हटले होते. इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गतिरोधकांची उंची ४ इंचापेक्षा जास्त नसावी, मात्र गोल्फादेवी रस्त्यावर बांधण्यात आलेले गतिरोधक ८ इंचापेक्षा अधिक उंच आहेत. तसेच त्यावर काळ्या-पाढऱ्या रंगातील पट्टे रंगवणे आवश्यक आहे. मात्र या गतिरोधकांवर रंग लावण्यात आलेला नाही. हे गतिरोधक उभारताना मार्गदर्शक तत्त्वांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कोळी यांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation erected speed breakers for the safety of pedestrians mumbai print news amy