मुंबई : महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी येत्या २ ते ६ डिसेंबरदरम्यान, तसेच ११ आणि १२ डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमधील केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहे. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे आणि वेळापत्रकानुसार संबंधित केंद्रावर निश्चित वेळेत उपस्थित राहावे, अशी सूचना महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून २० ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान, तसेच सुधारित जाहिरातीनुसार, २१ सप्टेंबरपासून ११ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. उमेदवारांसाठी २ डिसेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान तसेच ११ डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत रोज तीन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत. उमेदवाराला अर्ज क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉगिन करता येईल. लॉगिन केल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध असलेले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे. प्रवेश पत्रावर उमेदवारांसाठी परीक्षेसंदर्भात महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी या सूचना काळजीपूर्वक वाचून पुढील कार्यवाही करावी.
हेही वाचा : मुंबई : महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदासाठी १० डिसेंबर रोजी परीक्षा
दरम्यान, उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी मदत सेवा क्रमांक ९५१३२५३२३३ जारी करण्यात आला आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान जेवणाची सुट्टी (दुपारी १.३० ते २.३०) वगळून उमेदवारांनी या मदत क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.