मुंबई : दादरमधील शिवाजी पार्क मैदानातील माती काढण्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर मुंबई महापालिकेने आता या ठिकाणी माती काढण्यासाठी दोन यंत्रे उपलब्ध केली आहेत. मात्र दिवसा मैदानात सुरू असलेली उन्हाळी शिबिरे, क्रिकेटचे सामने यामुळे कामावर मर्यादा येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर १ मे रोजी होणाऱ्या पोलीस परेडचा सरावही सुरू झाला आहे. त्यामुळेही माती काढण्यास पुरेशी जागा मिळत नसल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. पोलीस परेडसाठी दरवेळेप्रमाणे अतिरिक्त माती आणून मैदानात टाकू नये, अशा आशयाचे पत्र पालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला लिहिले आहे.

हेही वाचा : मैदान निसटू न देण्यासाठी मोदींच्या सभांवर सभा!

शिवाजी पार्कमधील उडणाऱ्या धुळीचा विषय निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच तापला आहे. निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिवाजी पार्क रहिवासी संघटनेने दिल्यानंतर पालिका प्रशासनाने याविषयी आपली भूमिका मांडली आहे. पालिकेच्या जी उत्तर विभागाने १३ एप्रिलपासून या मैदानातील माती काढण्यास सुरुवात केली आहे. मात्र गेल्या नऊ दिवसांत मैदानातील एका छोट्याशा भागातील मातीही काढण्यात आलेली नाही. सध्या मैदानाच्या उत्तर दिशेला असलेल्या स्काऊट हॉलपासून ते राजा बढे चौकापर्यंतच्या ३० चौरस मीटर भागातील माती काढली जात आहे.

मात्र, हा वेग अतिशय कमी असल्याचे रहिवासी संघटनेचे म्हणणे आहे. आता पोलीस परेडचे कारण पालिका प्रशासनाकडून दिले जात असले तरी पोलीस परेडचा सराव सकाळी सुरू असतो मग नंतर ताबडतोब काम का सुरू करत नाही, असा सवाल संघटनेचे प्रकाश बेलवडे यांनी केला आहे.

हेही वाचा : संविधान बदलाची चर्चा हा बाबासाहेबांचा अपमान; रामदास आठवले यांचा आरोप, दलित मोदींच्या पाठीशी असल्याचा दावा 

याबाबत जी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, माती काढण्याचे काम सुरू असून सध्या वापरण्यात येत असलेल्या यंत्राची क्षमता दोन ते अडीच मेट्रिक टनाची आहे. हे यंत्र माती शोषून घेते व बाजूला असलेल्या नाना नानी पार्कात नेऊन टाकली जाते. अशा दिवसभरात चार-पाच फेऱ्यांमधून सुमारे १० मेट्रिक टन माती काढली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता दोन यंत्रे वापरण्यास सुरुवात केल्यामुळे हे प्रमाण दुप्पट होईल. काढलेली माती टाकण्यासाठी मुंबईत दोन ठिकाणी उद्यानात जागा दिली आहे. काढलेली माती झाकून वाहून नेणे आणि तिथल्या उद्यानात टाकणे याकरिता वेळ लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र

दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क मैदानात पोलिसांची परेड आयोजित केली जाते. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे परेडसाठी या मैदानात माती आणून टाकली जाते. ही माती तिथे तशीच राहते. वर्षानुवर्षे ही माती साठलेली असल्याचे बेलवडे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation facing difficulties in removing soil from shivaji park ground in dadar mumbai print news css