लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कामात कुचराई केल्याबद्दल ‘क्लीन अप मार्शल’ संस्थेला मुंबई महापालिकेने दंड ठोठावला. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी पालिका मुख्यालयात क्लीन अप मार्शल संस्थांची झाडाझडती घेतली. १२ पैकी सात कंत्राटदारांना दंड लावण्यात आला असून एकूण सुमारे ६५ लाख रुपये वसून करण्यात येईल.

एरव्ही रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या मुंबईकरांकडून दंड वसूल करणाऱ्या क्लीन अप मार्शलनाच पालिका प्रशासनाने दंड ठोठावला आहे. कामात कुचराई केल्याबद्दल क्लीन अप मार्शल संस्थाकडून मुंबई महापालिकेने दंड लावला आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी पालिका मुख्यालयात गुरुवारी क्लीन अप मार्शल संस्थांची झाडाझडती घेतली. कामात कसूर करणाऱ्या क्लीन अप मार्शल संस्थांनाकडूनच पालिकेने दंड आकारण्यास सुरूवात केली आहे. बारापैकी सात कंत्राटदारांना दंड लावण्यात आला असून एकूण सुमारे ६५ लाख रुपये वसून करण्यात येणार आहेत.

रस्त्यावर कचरा टाकणारे, थुंकणारे, अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेने क्लीन अप मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. या क्लीन अप मार्शलच्या कामगिरीबाबत एक आढावा बैठक पालिका मुख्यालयात गुरुवारी झाली. मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ‘स्वच्छ मुंबई अभियानाअंतर्गत मुंबईत स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या क्लीन अप मार्शलच्या संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. त्यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी क्लीन अप मार्शल कंत्राटदाराची झाडाझडती घेतली. या बैठकीला घनकचरा व्यवस्थापन संस्थांना उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. स्वच्छतेसंदर्भात कारवाईसाठी नेमलेल्या क्लीन अप मार्शल यांना अधिक सक्रिय करावे. प्रशासकीय विभाग (वॉर्ड) निहाय प्रत्येकी ३० क्लीन अप मार्शलची नियुक्ती केली असताना काही ठिकाणी त्यापेक्षा कमी संख्येने मार्शल कार्यरत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी, उपद्रव करणाऱ्यांविरोधात कारवाईचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे, क्लीन अप मार्शलच्या संस्थांनी तातडीने प्रत्येक विभागात मंजूर ३० क्लीन मार्शल नियुक्त करावेत आणि अस्वच्छतेस कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी. तसेच ज्या संस्थांविरोधात तक्रारी आहेत. त्यांच्यावरदेखील त्वरित कारवाई करावी, असे आदेश डॉ. जोशी यांनी दिले आहेत.

नागरिकांकडून साडे चार कोटी दंड वसूल

मागील ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये क्लीन अप मार्शलनी १ लाख ४० हजार ५८४ नागरिकांकडून ४ कोटी ५४ लाख ५१ हजार ४१२ रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र काही विभागांमध्ये क्लीन अप मार्शलची कारवाई अजिबातच दिसत नाही. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईच्या संख्येत वाढ करावी, असे सक्त निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.

कोणत्या कंत्राटदाराकडून किती दंड

दरम्यान, कामकाजात कसूर केल्याप्रकरणी लालबाग परळचा भाग असलेल्या एफ दक्षिण विभागात कार्यरत संस्थेकडून ३१ लाख ३४ हजार रुपये, बोरिवलीच्या आर मध्य विभागातील संस्थेकडून १६ लाख ३ हजार रुपये, तर, कांदिवलीच्या आर दक्षिण विभागातील संस्थेकडून १२ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात यावा, असे आदेशही डॉ. जोशी यांनी आढावा घेतल्यानंतर दिले आहेत.

Story img Loader