मुंबई : मुंबई महानगरपालिकेने गेल्याच आठवड्यात बहुचर्चित जाहिरात धोरणाचा मसुदा जाहीर केला. मात्र त्यातील नियमावलीकडे पालिकेच्याच अन्य विभागांनी दुर्लक्ष केले असून पश्चिम दृतगती मार्गावर रस्त्याच्या मधोमधच पालिकेने जनजागृतीच्या जाहिरातींसाठीचे फलक लावले आहेत. हे फलक डिजिटल स्वरुपाचे असून वाहनचालकांचे त्यामुळे लक्ष विचलित होत असल्याची तक्रार वाहनचालकांनी केली आहे.
जाहिरात फलकांबाबतचे धोरण नुकतेच महापालिकेने प्रसिद्ध केले असून त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. या धोरणात अनेक नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या वाहतूक दुभाजकावर फलक लावता येणार नाही, रस्त्यांच्या वरून जाणाऱ्या पादचारी पुलाच्या कमानीवर जाहिरात लावता येणार नाही, रस्त्याच्या मध्येच डोकावणाऱ्या जाहिराती लावता येणार नाही असे अनेक नियम घालण्यात आले आहेत. अद्याप हे धोरण मंजूर झालेले नसले तरी पालिकेने इतरांसाठी जे नियम घातले आहेत त्याचा पालिका प्रशासनालाच विसर पडल्याचे दिसत आहे.
हेही वाचा – सलग सुट्टीच्या दिनी कोकणात धावणार विशेष रेल्वेगाडी
पश्चिम दृतगती मार्गावरील मृणालताई गोरे उड्डाणपुलावर वाहतूक दुभाजकावर जाहिरात फलक अक्षरश: डकवले आहेत. तर याच मार्गावर डिजिटल जाहिरातींचे फलकही लावले असून त्यावरील रंगीबेरंगी चलतचित्रांमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत असल्याची तक्रार वॉचडॉग फाऊंडेशनने पालिका प्रशासनाला केली आहे. पालिका प्रशासनाने इतरांसाठी जे नियम केले आहेत ते आधी स्वत: पाळावे अशी प्रतिक्रया वॉचडॉगचे पिमेंटा गॉडफ्रे यांनी दिली. असेच फलक हे वांद्रे परिसरातही असल्याचे गॉडफ्रे यांनी सांगितले.
हेही वाचा – मुंबई : दोन दिवसातच म्हाडाचे सोडतीचे अॅप मंदावले
दरम्यान, पालिकेने महसूल वाढीसाठी काही महिन्यांपूर्वी मुंबईत विविध भागात लावण्यासाठी २०० जाहिरात फलकांकरीता निविदा मागवल्या होत्या. त्यातून पालिकेला ९ कोटींचा महसूल मिळणार आहे. त्याकरीता हे जाहिरात फलक मुंबई महापालिकेने विविध ठिकाणी लावले आहेत. मात्र धोरणाचा मसुदा येण्यापूर्वीचे हे जाहिरात फलक असल्याची प्रतिक्रिया पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे नव्या नियमानुसार हे सर्व फलक लवकरच हटवले जातील किंवा त्यांना नियमानुसार नवीन ठिकाणी जागा दिली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
© The Indian Express (P) Ltd