मुंबई : महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे पावसाळापूर्व खबरदारी म्हणून मोठ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात येत असून आतापर्यंत २२ हजार ३३४ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. तसेच, खासगी तसेच शासकीय मालकीच्या परिसरामधील झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासंदर्भात ४ हजार ९०९ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे.
मुंबई महानगरामधील धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे व्यापक मोहीम सुरू आहे. महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी १५ लाख ५१ हजार १३२ एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर १० लाख ६७ हजार ६४१ झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण झाडांपैकी १ लाख ८६ हजार २४६ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. त्यापैकी १ लाख ४८ हजार १६९ हजार झाडांची छाटणी अपेक्षित आहे. त्यापैकी १९ एप्रिलपर्यंत २२ हजार ३३४ झाडांची छाटणी झाली आहे. येत्या ७ जूनपर्यंत उर्वरित झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
हेही वाचा : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
खासगी जागेतील झाडांच्या छाटणीसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा
महानगरपालिका क्षेत्रात गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय – निमशासकीय संस्था, खासगी जागा येथील झाडांची निगा राखण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. त्यामुळे, अशाप्रकारच्या खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करायची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.