लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना कचरा शुल्क लावण्याचे ठरवले असून १०० रुपये ते ७५०० रुपये शुल्क वसूल आकारण्यात येणार आहे. निवासी इमारतींसह हॉटेल, सभागृह, लग्नाचे हॉल, दवाखाने, वसतिगृहे अशा सगळ्याच आस्थापनांना हे शुल्क लावले जाणार आहे. अंतिमत: हे शुल्क सर्व सामान्यांच्या खिशातूनच जाणार हे उघड आहे.

मुंबईकरांवर कचरा संकलन शुल्क लावण्याची तयारी घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुरू केली आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या आणि घन कचऱ्याचे वाढते प्रमाण यामुळे मुंबईकरांवर घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यात येणार आहे. घराघरातून, कार्यालयातून, इमारतीतून कचरा संकलन करण्याबाबतचे हे शुल्क आहे.

मुंबईकराच्या मालमत्ता करातून हे शुल्क वसूल केले जाणार आहे. त्यामुळे त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहेच. पण हॉटेल, दवाखाने, कार्यालये, सभागृह अशा इतर आस्थापना यांना मोठे शुल्क लावल्यामुळे त्याचा भारही अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांवरच येणार आहे.

असे आहे शुल्क

  • ५० चौरस मीटरपर्यंतची घरे (बांधलेले क्षेत्र) – १०० रुपये
  • ५० चौरस मीटरपेक्षा जास्त घरे. ३०० चौरस मीटरपर्यंतचे बांधलेले क्षेत्र – ५०० रुपये
  • ३०० चौरस मीटर जास्त बांधकाम क्षेत्रफळ असलेली घरे – १००० रुपये
  • व्यावसायिक कार्यालये, सरकारी कार्यालये – ७५० रुपये
  • दुकाने, जेवणाची ठिकाणे – १०० रुपये
  • वसतिगृह – ७५०
  • हॉटेल (अतारांकित) – १५०० रुपये
  • हॉटेल (३ तारांकित) – २५०० रुपये
  • हॉटेल (३ तारांकितपेक्षा जास्त) – ७५०० रुपये
  • दवाखाना – १०० रुपये
  • ३००० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले सभागृह, विवाह सभागृह – ७५०० रुपये

कचऱ्याचे नियोजन

  • मुंबईत दरदिवशी सुमारे ६५००मेट्रीक टन कचरा तयार होतो.
  • दररोज वाहनांच्या सुमारे साडेनऊशे फेऱ्या करून कचरा कांजूर व देवनार येथील कचराभूमीवर नेला जातो. मात्र या कचराभूमीची क्षमता संपत आली असून तिथे साठलेले कचऱ्याचे डोंगर कमी करण्यासाठी विविध प्रकल्प राबवणे ही भविष्यातील गरज आहे.
  • मुंबईची सव्वा कोटी लोकसंख्या आणि दररोज मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांची सुमारे ५० लाखापर्यंतची चललोकसंख्या आहे. या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभाग करीत असतो.
  • पालिकेचे कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी असे मिळून सुमारे ४४ हजार कामगार तीन पाळ्यांमध्ये या विभागात काम करतात.

मुंबईकराना आपल्या सूचना नोंदवण्याची संधी

bmc.swmbyelaws2025@gmail.com या ईमेलवर किंवा घनकचरा व्यवस्थापन मुख्य कार्यालयात लेखी सूचना व हरकती पाठवाव्यात, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ज्यांना लेखी स्वरूपात सूचना अथवा हरकती पाठवावयाच्या असतील त्यांनी, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (शासकीय व सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळता) सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत – प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांचे कार्यालय, तिसरा मजला, महानगरपालिका खटाव मंडई इमारत, अविष्कार इमारतीसमोर, स्लेटर रोड, ग्रँट रोड (पश्चिम), मुंबई-४००००७ या कार्यालयीन पत्त्यावर सूचना / हरकती पाठवता येणार आहेत.