मुंबई : पालिकेच्या पी उत्तर विभागात कुंदन वळवी, एफ उत्तर विभागात नितीन शुक्ला, तर बी विभागात शंकर भोसले यांची साहाय्यक आयुक्तपदावर नेमणूक केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला तीन नवे साहाय्यक आयुक्त मिळाले आहेत. दरम्यान, साहाय्यक आयुक्तपदासह अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या उपायुक्त किरण दिघावकर, संतोषकुमार धोंडे आणि पृथ्वीराज चौहाण यांची साहाय्यक आयुक्तपदावरून मुक्तता झाली.

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी २८ जून २०२४ रोजी एका दिवसात नऊ प्रशासकीय अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देऊन प्रशासकीय जबाबदाऱ्या दिल्या होत्या. यामध्ये चार साहाय्यक आयुक्तांची प्रभारी उपायुक्त म्हणून पदोन्नती केली होती. तसेच त्यांना साहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. त्यामुळे संबंधितांना उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्त अशी दोन्ही पदे सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र, तीन विभागांमध्ये नवीन साहाय्यक आयुक्तांची नेमणूक झाल्यामुळे उपायुक्तांना दिलासा मिळाला. मुख्यालयातील घनकचरा व्यवस्थापन खात्यातील उपायुक्त व पी उत्तर विभागातील साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या जागेवर कुंदन वळवी, परिमंडळ – ६ चे उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या जागी शंकर भोसले व मुख्यालयातील मालमत्ता आणि एफ उत्तर विभागातील साहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहाण यांच्या ठिकाणी नितीन शुक्ला यांची नेमणूक केली आहे.

अधिकाऱ्यांना दिलासा

गेल्या अनेक महिन्यांपासून पालिकेत पदभरती आणि पदोन्नती रखडल्या होत्या. त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जागेवर साहाय्यक आयुक्त व उपायुक्तांना प्रभारी म्हणून कार्यभार सोपवला. किरण दिघावकर हे पी उत्तर विभागात साहाय्यक आयुक्तपदासह घनकचरा खात्यात उपयुक्तपदावर कार्यरत होते, तर संतोषकुमार धोंडे हे बी विभागातील साहाय्यक आयुक्तपदासह परिमंडळ ६ मध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यामुळे दोन्ही कार्यालयांत प्रवास करताना त्यांना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, आता नवीन नेमणुका झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

Story img Loader