मुंबई : भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी मिळण्याची शक्यता मावळल्यामुळे मुंबई महापालिकेने पाणीकपातीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे १ मार्चपासून मुंबईभर १० टक्के पाणीकपात लागू होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईची तहान भागवणाऱ्या सातही धरणांत केवळ ४५.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वांत कमी पाणीसाठा आहे. हे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार नसल्याने भातसा आणि ऊर्ध्व वैतरणातील राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी पालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र १० दिवस उलटूनही सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे पाणीकपातीचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा >>>गृह प्रकल्प वेळेत पूर्ण न करणारे विकासक, कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे म्हाडाला निर्देश
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांत मिळून सहा लाख ५७ हजार ५४६ दशलक्ष लिटर म्हणजेच ४५.४३ टक्के पाणीसाठा आहे.
मार्चमध्येच राखीव साठ्याची मागणी
धरणांतील साठा कमी झाल्यामुळे राखीव साठ्यातून पाणी मागण्याची वेळ महापालिकेवर मार्चमध्येच आली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे पालिकेची राखीव साठ्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली होती. त्यामुळे पाणीकपात टळली होती. मात्र, पावसाने पुन्हा ओढ दिल्यामुळे जुलैमध्ये १० टक्के कपात करावी लागली होती. पाणीसाठा ८१ टक्के झाल्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये ती रद्द करण्यात आली होती.
१० टक्के पाणी कपात टाळता येईल इतका राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याला राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळालेला नाही. – इक्बाल सिंह चहल, आयुक्त-प्रशासक, मुंबई महापालिका