मुंबई : पावसाळापूर्व नालेसफाईला सुरूवात झालेली असतानाच आता नालेसफाईतील कुचराईची प्रकरणेही समोर येऊ लागली आहेत. मोठ्या नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांपैकी ३१ ठिकाणी कामात निष्काळजीपणा, त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. गोवंडीमध्ये कंत्राटदाराने नालेसफाईला सुरूवातच केलेली नसल्याचे आढळून आले आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या वेगवेगळ्या कंत्राटदाराना मिळून एकूण ३० लाख ८३ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबईत दरवर्षी पावसाचे प्रत्यक्ष आगमन होण्यापूर्वी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. तर, विभाग कार्यालयांच्या पातळीवर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यास मदत होते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून गाळ उपशाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येते. यंदा पावसाळयापूर्वी एकूण १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पैकी आतापर्यंत ६ लाख २३ हजार ६३१ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ६१.०३ टक्के गाळ काढण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी नालेसफाईच्या कामांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
हेही वाचा…कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून रोगनिदान व उपचार खर्च कमी व्हावा, राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपाद
प्रतिवर्षाप्रमाणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात यंदाही नाल्यांतून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू करण्यात आली. या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले आहेत. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरातील मोठ्या नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी व तपासणी दरम्यान कामामध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे एकूण ३१ ठिकाणी कंत्राटदारांना दंड ठोठाविण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कामातील त्रुटीनुसार दंड रक्कम निश्चित करण्यात आली आहे. कंत्राटदारांच्या देय रकमेतून सदर दंडाची रक्कम कापून घेण्यात येणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिनांक २७ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पाहणी दरम्यान गोवंडी येथील डम्पिंग नाला या नाल्यातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात न केल्याने कंत्राटदार डी बी इन्फ्रास्ट्रक्चर यांना रुपये एक लाख दंड लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा…‘जेल का जवाब वोट से’, महाविकास आघाडीच्या रॅलीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही हजेरी
कोणत्या कंत्राटदाराला किती दंड …..
शहर विभागातील १२ ठिकाणच्या कंत्राटदारांना ….१९ लाख ७५ हजार रूपये
पूर्व उपनगरातील १० कंत्राटदारांना ……७ लाख २० हजार रूपये
पश्चिम उपनगरातील ९ कंत्राटदारांना …….३ लाख ८८ हजार रूपये