मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कार्यकारी अभियंता व उप प्रमुख अभियंता पदावरील अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवले आहेत. पालिकेत सध्या सहाय्यक आयुक्तांच्या सुमारे ५० टक्के जागा रिक्त असून अनेक विभागांना पूर्ण वेळ सहाय्यक आयुक्त नाहीत तर अनेक अधिकाऱ्यांच्या बढतीही त्यामुळे रखडल्या आहेत. अनेक अधिकाऱ्यांना एकापेक्षा अधिक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती ही लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. या पदावर बढतीने नियुक्ती दिली जात नाही. महानगरपालिकेत २४ विभागीय कार्यालयांचे प्रमुख हे सहाय्यक आयुक्त असतात. तर कर निर्धारण व संकलन, नियोजन अशा अन्य खात्यांचे प्रमुखपदीही सहाय्यक आयुक्त असतात. मात्र गेल्या काही वर्षात सहाय्यक आयुक्तांची ही पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त राहत आहेत. महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. एकूण ३५ पदांपैकी केवळ १७ पदे ही भरलेली आहेत. उर्वरित १८ पदांपैकी ११ पदांवर कार्यकारी अभियंत्यांना अथवा उपप्रमुख अभियंत्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्तपदी सध्या असलेले काही अधिकारी हे उपायुक्त पदासाठी पात्र झालेले आहेत. मात्र सहाय्यक आयुक्त पदासाठी उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांचीही बढती रखडली आहे. काही अधिकारी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त अशा दोन्ही पदांचा कार्यभार सांभाळत आहेत. लोकसेवा आयोगातर्फे या जागा भरल्या जात नाही तोपर्यंत या जागांवर नियुक्त करण्यासाठी पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने कार्यकारी अभियंता व उप प्रमुख अभियंता पदावरील अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation invited applications from executive engineers for the post of assistant commissioner mumbai print news amy
First published on: 26-06-2024 at 22:35 IST