मुंबई : चीनसह अनेक देशांत करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने केंद्र सरकारने २० आणि २२ डिसेंबर २०२२ रोजी अद्ययावत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबईमधील रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांसाठी २ हजार ८०४ खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमधील करोनाविषयक नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात येणार असून, नागरिक कोणत्याही अडचणीच्या वेळी त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. करोना रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेशा स्वरूपात प्राणवायू सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 आंतरराष्ट्रीय स्तरावर करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ प्राधिकरणामार्फत  प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. सर्व सकारात्मक नमुने जनुकीय तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.  करोना चाचण्यांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्णसंख्येत वाढ झाल्यास करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने सेव्हन हिल्स (१७००) आणि कस्तुरबा (३५) या रुग्णालयांमध्ये सर्व तयारी केली आहे. तसेच कामा रुग्णालय (१००), सेंट जॉर्ज रुग्णालय (७०), टाटा रुग्णालय (१६), जगजीवन राम रुग्णालय (१२) आणि २६ खासगी रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध केल्या आहेत.

हेही वाचा – करोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय! प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे..

सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर करणे, इतरांपासून अंतर राखणे, साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे, आजारी असताना घरी अलगीकरणात राहणे आदी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation is ready to face corona mumbai news ysh