मुंबई : मार्च २०२३ च्या दहावीच्या परीक्षेत मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळांचा निकाल ८५ टक्क्यांपेक्षा कमी लागला अशा ८८ शाळांच्या मुख्याध्यापकांना पालिकेच्या शिक्षण विभागाने नोटीस पाठवली आहे. सात दिवसांच्या आत खुलासा न पाठवल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २४९ माध्यमिक शाळा मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये आहेत. या शाळांचा यंदाचा दहावीचा निकाल गेल्यावर्षीपेक्षा वाईट लागला होता. गेल्यावर्षी ९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर यंदा केवळ ८७ टक्के निकाल लागला. त्यामुळे पालिकेच्या शिक्षण विभागाने येत्या मार्च २०२४ चा निकाल चांगला लागावा याकरीता आतापासून शाळांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : शरद पवारांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
त्याचाच एक भाग म्हणून गेल्या परीक्षेत ज्या शाळांचा निकाल ८५ टक्क्यांपेक्षा कमी लागला अशा ८८ शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाने नोटीस पाठवली आहे. मात्र या नोटीसमुळे शिक्षण विभाग वादात सापडले आहे. याबाबत विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी याबाबत शिक्षण विभागाला पत्र लिहून या नोटीसा मागे घेण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा : “बॉम्बस्फोटाच्यावेळी दाऊद भाजपा अध्यक्ष होता, असं…”; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले…
निकाल कमी लागण्यामागे वेगळीही कारणे असू शकतील, त्याचा शिक्षण विभागाने शोध घ्यावा. निकाल चांगला लागण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन व अधिकचे मार्गदर्शन करावे. मुख्याध्यापक व शिक्षकांना कारवाईची भीती दाखवून भीतीचे वातावरण निर्माण करू नये, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. शिक्षणाधिकारी राजू तडवी यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, ८५ टक्के निकाल ही खूपच गंभीर बाब आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापकांना आम्ही नेहमीच सूचना देत असतो. प्रथमच लेखी सूचना दिल्या आहेत. मुलांची प्रगती व्हावी या हेतूने या नोटीसा देण्यात आल्याचे ते म्हणाले.
असा होता निकाल
१०० टक्के निकाल…४१ शाळा..
९५ ते ९९ टक्के निकाल…३२ शाळा
९० ते ९४.९९ टक्के निकाल ….३८ शाळा
८५ ते ८९.९९ टक्के निकाल….४४ शाळा