वारंवार मुदतवाढ देऊनही दुकानांवर मराठी पाट्या लावण्यास टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध मुंबई महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. सोमवारपासून कारवाईला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशीच ५२२ दुकानदारांवर नोटीस बजावण्यात आली आहे.
दुकानांवर मराठी नामफलक लावण्यासाठी चौथ्यांदा दिलेली मुदतवाढ ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. मात्र तरीही ४८ टक्के दुकानांच्या दर्शनी भागात मराठी भाषेत पाट्या लागलेल्या नाहीत. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सोमवारपासून दुकानदारांवर कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात २४ विभागातील दुकानांची पाहणी करण्यात येणार आहे. दुकानांवर ठळक अक्षरात मराठी नामफलक नसल्यास दुकानदारांना सात दिवसांची नोटीस दिली जाणार आहे. या कालावधीत दुकानदारांनी फलकावर दुरुस्त न केल्यास त्यांना कायदेशीर नोटीस देऊन नियमानुसार खटला दाखल करणे, दंड वसूल करणे अशा स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.
हेही वाचा >>>मुंबई : ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून पेच ; पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गटात लढाई
पहिल्या दिवशी २ हजार १५८ दुकानांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ६३६ ठिकाणी मराठी नामफलक असल्याचे आढळून आले. उर्वरित ५२२ ठिकाणी मराठी नामफलक नसल्याचे आढळून आले. या दुकानदारांना नियमानुसार सात दिवसांची नोटीस देण्यात आली आहे. सात दिवसांत त्यांनी दुकानावर मराठी नामफलक न लावल्यास त्याच्याकडून दंड वसुली किंवा खटला दाखल केला जाणार आहे.
हेही वाचा >>>मुंबई : नायर इस्पितळातील औषध दुकानात परवाना नसलेल्या औषधांचा पुरवठा !
दरम्यान, मुंबईत पाच लाख दुकाने असून महानगरपालिकेने आतापर्यंत दोन लाख दुकानांची पाहणी केली. त्यापैकी साधारण ४८ टक्के दुकानदारांनी दुकानांवर मराठी नामफलक लावलेले नाहीत. अमराठी रहिवाशांचे प्रमाण अधिक असलेल्या मुंबईतील भागांमधील दुकानांवर मराठी नामफलकांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सर्वेक्षण करून पुढील आराखडा आखण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.राज्य सरकारने मार्च महिन्यात सर्व दुकाने, आस्थापनांवर ठळक शब्दात मराठी फलक लावणे बंधनकारक करणाचा निर्णय घेतला होता. मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबईत त्याची अंमलबजावणी केली जात आहे. व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीमुळे आतापर्यंत चार वेळा मराठी फलक लावण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. चौथ्यांदा दिलेली मुदतवाढ ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली.