मुंबई : रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करीत असताना झाडांच्या बुंध्याभोवतीही काँक्रिटीकरण केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयाने आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाला नोटीस बजावली आहे. वृक्षाभोवतीचे काँक्रिटीकरण काढून वृक्षाभोवती १ मीटर लांबी-रुंदीची जागा सोडून त्यात लाल मातीचा भराव करण्याचे निर्देश विमानतळ प्राधिकरणाला दिले आहेत. या नियमाची पूर्तता न केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
सहार गावातील टर्मिनल २ जवळील सहार पोलीस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाकडून रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र हे काँक्रीटीकरण करत असताना या मार्गावरील किमान ५० झाडांचे नुकसान झाले आहे. या झाडांना चिकटून काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. याबाबत वॉचडॉग फाऊंडेशनने राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता पालिकेच्या के पूर्व विभागाने आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाला नोटीस बजावली आहे.
के पूर्व विभागाने या ठिकाणाची पाहणी केली असता झाडांच्या बुंध्याला चिकटून काँक्रिटीकरण केल्याचे आढळून आले. झाडांची मुळे वाढण्याासाठी जागाच नसल्याने ती मृत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडांभोवतीचे हे काँक्रिटीकरण ताबडतोब काढून टाकावे असे निर्देश या नोटीसीद्वारे देण्यात आले आहेत. वृक्षाभोवती १ मीटर लांबी-रुंदीची चौकोनी जागा सोडावी व त्यात लाल मातीचा भराव टाकावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पालिकेच्या कार्यालयास छायाचित्रांसह सादर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ही कार्यवाही न केल्यास महाराष्ट्र वृक्ष संवर्धन व जतन अधिनियम १९७५ अन्वये कारवाई करण्यात येईल, असाही इशारा या नोटीसीद्वारे देण्यात आला आहे.
दरम्यान, काँक्रिटीकरणाच्या कामामुळे आधीच मुंबईतील झाडांच्या मुळांना फोफावण्यास वावच मिळत नाही. त्यामुळे झाडांभोवती १ मीटर लांबी – रुंदीचे अंतर सोडून पुढे काँक्रिटीकरण करावे, असे निर्देश आधीच राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. परंतु, त्याचे पालन बहुतांशी ठिकाणी होत नसल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी आधीच काही याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत.मुंबईमध्ये जमिनीच्या खाली मोठ्या प्रमाणावर उपयोगिता वाहिन्या असल्यामुळे व पदपथ आणि काँक्रीटच्या रस्त्यांमुळे झाडांच्या मुळांना वाढायला जागाच नसते. त्यामुळे झाडांचा समतोल बिघडतो व पावसाळ्यात झाडे उन्मळून पडण्याचा धोका असतो. म्हणून झाडांभोवती लालमातीचा भराव टाकून जागा सोडणे आवश्यक असल्याची माहिती उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.