लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : तापमानवाढीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी महापालिकेने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मुंबईत जाणवत असलेल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काय करावे, काय करू नये याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सूचना करण्यात आल्या आहेत. तहान नसतानाही पाणी पिणे, उन्हात गॉगल, छत्री, टोपी वापरणे अशा विविध सूचना पालिकेने दिल्या आहेत.

सद्यस्थितीत मुंबईसह राज्याच्या काही भागांमध्ये तीव्र उकाडा जाणवू लागला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात अशी परिस्थिती वारंवार उद्भवू शकते. त्यामुळे उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी नागरिकांनी या काळात काय करावे, काय करू नये, याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. नागरिकांनी या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. येत्या काळात उष्णतेची संभाव्य लाट आणि उष्माघात यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी दिले आहेत. याअनुषंगाने महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उष्माघातामुळे होणारे गंभीर आजार टाळण्यासाठीचे उपाय

  • तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या.
  • हलके, सौम्य व फिक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला.
  • उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री , टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
  • प्रवासात पाणी सोबत ठेवा.
  • मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळा, कारण त्याद्वारे शरीराचे निर्जलीकरण होते.
  • उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
  • बाहेर काम करत असाल, तर टोपी किंवा छत्री वापरा. शक्य असल्यास मोठ्या सुती कापडाने डोके व चेहरा झाकून घ्या.
  • डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातपायांवर ओलसर कापडही वापरा.
  • अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
  • ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक, नारळपाणी आदी घरगुती पेये नियमितपणे प्या.
  • जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या.
  • घरात पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
  • वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा.

उष्माघातामुळे बाधित झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी सूचना

  • बाधित व्यक्तिला थंड जागी, सावलीखाली ठेवा. तिला ओल्या कपड्याने पुसून काढा. डोक्यावर सामान्य तापमानाचे पाणी घाला.
  • संबंधित व्यक्तिला ‘ओआरएस’ प्यायला द्या किंवा शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण संतुलित करण्यासाठी उपयुक्त पेय द्या.
  • व्यक्तिला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो म्हणून रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करा.

Story img Loader