मुंबई : वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गाच्या कामासाठी मुंबई महापालिकेने आता भूसंपादनाची पूर्वप्रक्रिया सुरू केली आहे. त्याकरीता या मार्गाचे संरेखन विकास आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी मुंबई महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी पश्चिम उपनगरातील एकूण ६१ भूखंड आरक्षित करावे लागणार असून त्याकरीता मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागाने हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचनांनंतर हा फेरबदल राज्य सरकारच्या मंजूरीसाठी पाठवला जाणार आहे.
सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून रस्ता पूर्णतः खुला झाला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतून वांद्र्यापर्यंत थेट प्रवास शक्य झाला आहे. पालिका प्रशासनाने आता या प्रकल्पाचा जो भाग पश्चिम उपनगरात आहे त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. यापूर्वी मंजूर विकास आराखडा २०३४ मध्ये पश्चिम उपनगरातील सागरी किनारा मार्ग हा वर्सोवा ते मालाड मीठचौकीपर्यंतच होता. मात्र आता मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने सागरी किनारा मार्ग हा वर्सोवा ते दहिसर पर्यंत नेण्याचे ठरवले आहे. तसेच हा मार्ग गोरेगाव मुलुंडलाही जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे संरेखन सल्लागारांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे अंतिम करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे नवे संरेखन विकास आराखड्यात समाविष्ट करावे लागणार आहे. त्याकरीता विकास आराखड्यात फेरबदल करावे लागणार आहेत. त्यामुळे गोरेगाव मुलुंड जोडरस्ता ते दहिसरपर्यंत असलेल्या प्रस्तावित सागरी किनारा रस्त्याचे संरेखन विकास आराखड्यात समाविष्ट केले जाणार आहे. त्याकरीता मुंबई महापालिकेने जाहिरात देऊन सूचना जाहीर केली आहे. तसेच ३० दिवसांच्या आत संबंधितांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत.
वर्सोवा ते दहिसर हा १७.५७ किमीचा मार्ग आहे. त्यापैकी वर्सोवा ते गोरेगाव मुलुंड जोडरस्ता पर्यंतच्या ५.६० किमी लांबीचा मार्ग व गोरेगाव मुलुंडचा ४.४६ किमीचा कनेक्टर आधीच विकास आराखड्यात समाविष्ट आहे. आता गोरेगाव मुलुंड जोडरस्ता ते दहिसर पर्यंतच्या ११.३६ किमी लांबीच्या मार्गाचे संरेखन विकास आराखड्यात समाविष्ट केले जाणार आहे.
या भागातील भूखंड बाधित
गोरेगाव मुलुड जोडरस्ता ते दहिसर या मार्गासाठी पहाडी गोरेगाव, मालाड (प), मालवणी, चारकोप, बोरिवली, एक्सर, दहिसर या भागातील भूखंड बाधित होणार आहेत. यात सर्वाधित भूखंड हे एक्सर आणि मालाड भागातील आहेत. हा मार्ग बहुतांशी खाडी व कांदळवनातून जात असल्यामुळे हे बहुतांशी भूखंड सरकारी मालकीचे असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. हरकती व सूचना मागवल्यानंतर त्यावरील सुनावणीनंतर अंतिम फेरबदल हे राज्य सरकारच्या मंजूरीसाठी पाठवले जातील व त्यानंतर विकास आराखड्यात ते समाविष्ट होतील.
दक्षिण मुंबईतून थेट ठाणे जिल्ह्यात ….
वर्सोवा ते दहिसर असा हा पश्चिम उपनगरातील सागरी किनारा मार्ग असून या कामासाठी डिसेंबर २०२३ मध्ये कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. वर्सोवा ते दहिसर हा एकूण १७.५७ किमी हा मार्ग असून याकरीता १६,६२१ कोटींचा खर्च अंदाजित आहे. यां मार्गाचे सहा टप्पे असून बांगूर नगर ते माईंडस्पेस मालाड या दुसऱ्या टप्प्यात गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याला ४.४६ किमीचा एक जोड (कनेक्टर) देण्यात येणार आहे. या संपूर्ण मार्गावर पूल, बोगदा, उन्नत मार्ग अशी गुंतागुंतीची रचना आहे. त्यामुळे भविष्यात हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथून सागरी किनारा मार्गावरून थेट दहिसर-भाईंदर पश्चिम तसेच मुलुंड- ठाण्यापर्यंत जाता येणार आहे.