मुंबई : मुंबईतील शाळा आणि क्रीडांगणांच्या स्वच्छतेनंतर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आता धार्मिक स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विविध स्वयंसेवी संस्था, नागरिक, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगार, कर्मचारी आदींच्या सामूहिक प्रयत्नांतून येत्या २८ एप्रिल ते ९ मे या कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान संपूर्ण मुंबईत ही मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी महानगरपालिका प्रशासनाने डिसेंबर २०२३ मध्ये संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेतली. तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत पदपथ धूळमुक्त करणे, बेवारस वाहनांची विल्हेवाट, अनधिकृत फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची, क्रीडांगणांची, उद्यानांची स्वच्छता, रस्ते धुवून स्वच्छ करणे आदी विविध कामे स्वच्छताविषयक कामांवर भर देऊन शहर सुंदर ठेवण्याचा प्रयत्न पालिकेमार्फत केला जातो. या मोहिमेला व्यापक स्वरूप देत मुंबईतील लहान-मोठे रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका व खासगी रूग्णालये, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, क्रीडांगणे, विविध शाळांमध्ये स्वच्छतेचा जागर केला.
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवर १७ ते २२ मार्च या कालावधीत रोज रात्री १० ते सकाळी ६ वाजेदरम्यान व्यापक स्वच्छता करण्यात आली. मुंबईतील प्रमुख क्रीडांगणांमध्ये १ ते ४ एप्रिल, तर ७ एप्रिलपासून मुंबईतील शाळांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर आता मुंबईतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.
शहराची अत्यंत सखोल आणि व्यापक पद्धतीने स्वच्छता करण्याच्या अनुषंगाने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून आता मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. संबंधित धार्मिक स्थळाशी निगडित विश्वस्त आणि अन्य प्राधिकृतांशी समन्वय साधून त्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाईल. प्रामुख्याने धार्मिक स्थळाभोवतालचा परिसर, वाहनतळ, घनकचरा संकलनाचे ठिकाण, पदपथ आदींची अद्ययावत यंत्रे आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात येईल. अडथळा निर्माण करणाऱ्या वस्तूंचे निष्कासन, कचऱ्याचे संकलन आणि पाण्याने संपूर्ण परिसर धुवून काढणे आदींचाही यात समावेश असेल, अशी माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.