मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे यंदाही कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिन आणि पंधरवड्याचे आयोजन केले आहे. मराठी भाषा पंधरवड्याला २७ फेब्रुवारी रोजी सुरुवात करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे दुपारी ३ वाजता महानगरपालिका सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी भूषविणार आहेत.
महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या आदेशानुसार आणि उप आयुक्त किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महापालिका सातत्याने विविधस्तरिय उपक्रम राबवित असते. महानगरपालिकेने केलेल्या ठरावानुसार थोर साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २०१० पासून ‘मराठी भाषा पंधरवडा’साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी २७ फेब्रुवारी ते १३ मार्चपर्यंत महानगरपालिकेमार्फत विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येते. महानगरपालिकेच्या सर्व खात्यातील कामकाजाची भाषा मराठी असण्यासह मराठी भाषेचा १०० टक्के वापर व्हावा, यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत असते. तसेच दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी मराठी साहित्यातील अभ्यासक, विचारवंत, ज्येष्ठ लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, कादंबरीकार आदींचे महानगरपालिकेकडून व्याख्यान आयोजित केले जाते. यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पालिका मुख्यालयातील सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
मराठी भाषेचा प्रसार अणि प्रचार व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने दरवर्षी भित्तिपत्रके प्रकाशित केली जातात. ही भित्तिपत्रके महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये, शाळांमध्ये प्रदर्शित केली जातात. महापालिकेच्या वतीने ‘एकपात्री अभिनय’ स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कर्मचाऱ्यांचा आयोजित सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या मराठी शब्दकोशाचेही प्रकाशन यानिमित्ताने करण्यात येणार आहे. शासकीय कामकाजात नित्याने वापरात असलेले मराठी शब्द या शब्दकोशात घेण्यात आले आहेत.