मुंबई : बोरिवली पश्चिम येथील चिकूवाडी परिसरातील पद्मानगर येथे महापालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. संबंधित रस्त्याची कामे सुरू असताना शनिवारी तेथील मलनिस्सारण वाहिनीला फुटली. त्यामुळे संबंधित ठिकाणी खणलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शनिवारी फुटलेल्या मलनि:स्सारण वाहिनीची अद्यापही दुरुस्ती झाली नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. खड्ड्ड्यात साचलेल्या पाण्यात आता डासांची उत्पत्ती होऊ लागल्याने परिसरात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने तात्काळ ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मे अखेरपर्यंत रस्ते काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामांना वेग दिला आहे. या काँक्रीटीकरणाच्या कामांदरम्यान अनेकदा जमिनीखालील पर्जन्य, मलनि:सारण, जलवाहिन्या फुटण्याच्या घटना वारंवार घडत असतात. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने बोरिवलीतही मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत.

येथील रस्त्याचे काम सुरू असतानाच बोरिवलीतील पद्मा नगर येथील मलनि:स्सारण वाहिनी फुटली. त्यामुळे परिसरातील शिंपोली निरंजन को ऑप. हाउसिंग सोसायटी, पवन को ऑप सो , श्रेयस को ऑप सो. येथील प्रचंड वर्दळीच्या रस्त्यावर दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. या घटनेला जवळपास पाच दिवस उलटले असून अद्यापही महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. खड्ड्यात साचलेल्या दुषित पाण्यात आता मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन पालिकेने तात्काळ मलनिस्सारण वाहिनीची दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

साथीचे आजार पसरण्याची शक्यता

पालिकेने वेळीच कार्यवाही केली नाही तर या परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. डेंग्यू, मलेरियासारखे साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी महापालिका वेळोवेळी उपाययोजना करत असते. मात्र, बोरिवलीतील या समस्येकडे पालिका दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप रहिवाशांकडून होत आहे.

Story img Loader