मुंबई : वेळेवर खड्डे न बुजवल्यामुळे महापालिका प्रशासनाने १३ दुय्यम अभियंत्यांना नोटीस बजावली आहे. खड्डे वेळेत का बुजवले नाहीत, अशी विचारणा करणारी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. जोगेश्वरी – विक्रोळी जोड मार्ग, भांडुप, नाहूर येथील खड्ड्यांप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा मुंबईत खड्डे दिसू लागले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडून मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबई महापालिकेने यंदा विशेष काळजी घेतली होती.
पालिकेच्या एकूण २२७ बीटसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दुय्यम अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली होती. या दुय्यम अभियंत्यांना नेमून दिलेल्या विभागात त्यांनी दररोज रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे आढळल्यास ते तत्काळ बुजवण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांनी आधीच दिले होते. यानुसार आतापर्यंत सहा हजारांहून अधिक खड्डे पालिकेने बुजवले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र काही ठिकाणी रस्त्यांवर खड्डे तसेच असून खड्डे वेळीच न बुजवल्यामुळे ते मोठे झाले आहेत. तसेच दुय्यम अभियंत्यांना जबाबदार धरण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : अन्न व औषध प्रशासन गतिमान होणार! १०,४६८ पदे भरणार…
मुंबईतील खड्ड्यांवरून पुन्हा टीकाही सुरू झाली आहे. मुंबईत पाच हजार नाही तर २५ हजार खड्डे असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला होता. त्यातच गुरुवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी साहाय्यक आयुक्तांची बैठक घेऊन तत्काळ खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले. गेल्या आठवड्यात मुंबईत दिवसभरात ३०० मिमी पाऊस पडला. त्यामुळे विविध ठिकाणच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
© The Indian Express (P) Ltd