मुंबई : घाटकोपर दुर्घटनेत दोषी आढळलेल्या इगो मीडिया या जाहिरात कंपनीचे दादरच्या टिळक पूल परिसरात आठ फलक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी एका फलकाची लांबी ८० आणि रुंदी १०० फूट आहे. हे आठ फलक तीन दिवसांत काढून टाकावेत, अशी नोटीस पालिका प्रशासनाने पश्चिम रेल्वेला पाठवली आहे.
आपात्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत ही नोटीस बजावली असून तीन दिवसात फलक न काढल्यास पालिका ते निष्कासित करील आणि त्याचा खर्च रेल्वेकडून वसूल करण्यात येईल, असे या नोटीसीत म्हटले आहे. घाटकोपर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईतील सर्वच फलकांची माहिती गोळा केली आहे.
हेही वाचा…मुंबई : अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्याची भीती घालून लाखोंची सायबर फसवणूक, आरोपीला राजस्थानवरून अटक
मुंबईमधील रेल्वेच्या हद्दीतील एकाही जाहिरात फलकासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच पालिका प्रशासनाकडे जाहिरात शुल्कही भरण्यात येत नाही. मुंबईत जास्तीत जास्त ४० फूट बाय ४० फूट आकाराच्या जाहिरात फलकाला मुंबई महापालिका प्रशासन परवानगी देत असते. मात्र रेल्वेच्या हद्दीतील जाहिरात फलक त्यापेक्षा मोठे आहेत. काही ठिकाणी लांबी रुंदी १२० फूट म्हणजेच १४ हजार चौरस फुटाचे महाकाय क्षेत्रफळ असलेले जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. या फलकांना पालिकेची परवानगी नाही. त्यामुळे हे फलक पालिकेच्या लेखी बेकायदेशीर आहेत.
पालिकेच्या हद्दीतील एकूण १७९ जाहिरात फलकांपैकी महाकाय अशा फलकांची माहिती पालिकेने गोळा केली आहे. त्यात ४५ ठिकाणी महाकाय फलक असल्याचे आढळून आले आहेत. हे महाकाय फलक ताबडतोब हटवावे यासाठी पालिका प्रशासनाने रेल्वेला नोटीस पाठवली आहे. हे फलक न हटवल्यास आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यांतर्गत ते हटवण्यात येतील, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
हेही वाचा…महायुतीच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींकडे पाच मागण्या; म्हणाले “सर्वात आधी…”
दादरच्या टिळक पूल परिसरात रेल्वेच्या हद्दीत इगो मीडिया या कंपनीचे आठ महाकाय फलक असून हे फलक तीन दिवसांत हटवावे अशा आशयाची नोटीस पालिका प्रशासनाने पश्चिम रेल्वेला पाठवली आहे. आपत्कालीन कायद्यांतर्गत अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मुंबई शहर समुद्राच्या जवळ असून इथे पावसाळ्यात वादळी वारे वाहतात. यामुळे महापालिकेने जाहिरात फलकांचा आकार निश्चित केला आहे. त्यापेक्षा मोठ्या आकाराचे फलक उभारता येणार नाहीत. त्यामुळे टिळक पुलाच्या हद्दीतील हे फलक हटवावे अशा सूचना करण्यात आली आहे.
महाकाय फलकांपैकी सर्वाधिक १४ फलक दादर, वडाळा, नायगावचा भाग असलेल्या एफ उत्तर विभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत. हे फलक दादर टिळक पूल, पूर्व द्रुतगती मार्ग शीव, चुनाभट्टी स्थानक परिसरात आहेत. या फलकांची लांबी – रुंदी ४० ते ८० फुटांची आहे. तर घाटकोपरमध्ये दुर्घटनाग्रस्त फलकाइतकाच भव्य फलक वांद्रे स्थानक (पूर्व) परिसरात आहे. या सर्व फलकांना पालिकेने नोटीसा पाठवल्या आहेत.