मुंबई : हॉटेलच्या आरोग्य परवान्याच्या नूतनीकरणासाठी महापालिकेच्या कार्यालयात गेलेल्या हॉटेलमालकाकडे पालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी व कामगाराने लाच मागितल्याची घटना नुकतीच घडली. महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या वतीने लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाने पालिकेतील कामगाराला रंगेहाथ पकडले. तसेच, संबंधित वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि कामगारावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.

एका हॉटेलचा आरोग्य परवाना २१ फेब्रुवारी २०२५ रोजी संपुष्टात आल्याने संबंधित हॉटेल मालकाने परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेच्या विभाग कार्यालयात धाव घेतली. परवाना नूतनीकरणासाठी पालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांनी तक्रारदारास कार्यालयातील एका कामगाराला भेटण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने संबंधित कार्यालयातील कामगाराची भेट घेतली. काम करण्यासाठी मॅडमला ६ हजार रुपये द्यावे लागतील, तरच काम पूर्ण होईल, असे तक्रारदारास सांगण्यात आले. तसेच, त्यांनतर नूतनीकरणाचे पैसे ऑनलाईन पद्धतीने भरून परवाना नूतनीकरण करू शकाल, असेही कामगाराने स्पष्ट केले.

परवाना नूतनीकरणासाठी तक्रारदाराने संबंधित वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याची भेट घेतली. मात्र, त्यांनी थेट ६ हजार रुपये द्या, अशी मागणी केली. तुम्ही माझे एनटीआर काढा मी माझा परवाना नूतनीकरण करतो. त्यांनतर ६ हजार रुपये देईन, असे सांगत तक्रारदाराने काम पूर्ण करण्याची विनंती केली. मात्र, अधिकाऱ्याने तक्रारदाराच्या परवान्याचे काम केले नाही. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २१ मार्च रोजी संबंधित घटनेची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि कामगाराने परवाना नूतनीकरणासाठी तक्रारदाराकडे ६ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर लाचलुचपत विभागाने २४ मार्च रोजी सापळा रचला आणि अधिकाऱ्याच्या वतीने लाचेची रक्कम स्वीकारताना कामगाराला रंगेहाथ पकडले. तसेच, त्याच्याकडून ६ हजारांची रक्कम हस्तगत करण्यात आली. लाच घेतल्याप्रकरणी कामगाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.