मुंबई : मुंबई महानगरपालिकेने क्षयरोगाचे समुळ उच्चाटन व्हावे या उद्देशाने जनजागृती मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून काही वर्षांपूर्वी क्षयमुक्त झालेल्या २४ जणांची निवड करून त्यांच्यावर क्षयग्रस्त रुग्णांची भेट घेऊन समुपदेशन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे पुन्हा क्षयाची बाधा होण्याचा धोका असतानाही या मंडळींनी ही जबाबदारी स्वीकारली. क्षयरोगामुळे मानसिक स्थिती बिघडलेल्या रुग्णांसाठी ही मंडळी अल्पावधीतच आधार बनली होती. मात्र, मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अचानक या २४ जणांकडून हे काम काढून घेतले आहे. त्यामुळे रुग्णांच्या समुपदेशनात खंड पडण्याची शक्यात निर्माण झाली असून हे २४ जण बेरोजगार झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयमुक्त करण्याची घोषणा करून क्षयरोग निर्मूलनाला प्राधान्य दिले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनेही क्षयरोगाच्या समुळ उच्चाटनासाठी विविध उपक्रम, योजना आदी राबविण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत मुंबई क्षयरोग नियंत्रण संस्था कार्यरत असून या संस्थेची २४ डॉट केंद्रे विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. क्षय रुग्णांचा शोध घेणे, रुग्णांचे मनोबल वाढविणे, रुग्ण नियमित औषधोपचार घेतात की नाही, डॉक्टरकडे जातात का, पोषण आहार घेतात का आदी विविध कामे या संस्थेअंतर्गत करण्यात येतात. त्याचबरोबर क्षयरोगाबाबत व्यापक स्वरुपात जनजागृतीचे कामही हाती घेण्यात आले आहे.

हेही वाचा : क्रिकेटपटूंसाठी झालेली गर्दी फक्त बघू नका, मुंबईकरांची ‘ही’ जागरूकताही बघा; थेट पोलीस आयुक्तांनी शेअर केला Video!

क्षयाची बाधा झालेल्या आणि त्यातून बरे झालेल्यांनी रुग्णांना आपले अनुभव सांगितले तर त्याचा अनुकूल परिणाम होऊ शकतो ही संकल्पना पुढे आली आणि काही वर्षांपूर्वी क्षयाची बाधा झालेल्या, मात्र नियमित औषधोपचार, सकस आहार घेऊन क्षयमुक्त झालेल्या २४ जणांची या कामासाठी निवड करण्यात आली. ‘सक्षम क्षयरोग साथी’ या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. तसे नियुक्ती पत्रही त्यांना देण्यात आले. ‘सक्षम क्षयरोग साथी’ दर महिन्याला १० हजार ६०० रुपये मानधनाच्या स्वरुपात देण्यात येत होते. प्रत्येक केंद्रात एक याप्रमाणे २४ केंद्रात २४ ‘सक्षम क्षयरोग साथीं’ची नियुक्ती करण्यात आली. क्षयरुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे पुन्हा क्षयाची बाधा होण्याचा धोका पत्करून या मंडळींनी हे काम स्वीकारले.

पुन्हा क्षयाची बाधा होण्याचा धोका असतानाही हे २४ जण गेली तीन वर्षे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत रुग्णांच्या भेटी-गाठी घेऊन आपले काम नित्यनियमाने करीत होते. मात्र गेल्या आठवड्यात त्यांना एक संदेश पाठवून महापालिकेने कामावरून कमी केले आहे.

हेही वाचा : टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत गर्दीचा महापूर, तरुणीला आली चक्कर, व्हिडीओ व्हायरल

‘खचू दिले नाही’

क्षयाची बाधा झालेले रुग्ण मानसिकदृष्टी खचून जातात, अनेक रुग्ण लाजेखातर क्षय झाल्याचे दडवून वैद्याकीय उपचारच घेत नाहीत, काही रुग्ण अर्ध्यात उपचार सोडून देतात, काही रुग्णांची त्यांच्या कुटुंबाकडूनच हेटाळणी केली जाते. अशा रुग्णांना नित्य उपचार व पोषण आहार कसा घेतला याचा अनुभव कथन करून ‘सक्षम क्षयरोग साथी’ त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करीत होते.