मुंबई : महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने पावसाळापूर्व खबरदारी म्हणून धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणीची कामे हाती घेतली आहेत. या कामांतर्गत मुंबईतील डोंगर उतारावरील धोकादायक झाडांच्याही छाटणीला सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या सर्वेक्षणाअंती जवळपास ४० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. महानगरपालिका क्षेत्रासह वन विभागाच्या हद्दीतील ४१४ झाडांची छाटणी करणे आवश्यक असून आतापर्यंत ३०५ झाडांच्या छाटणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित झाडांची लवकरात लवकर छाटणी पूर्ण करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगरपालिका प्रशासनाने पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर दिला आहे. नाल्यांतून गाळ उपसण्याबरोबरच मुंबईतील धोकेदायक झाडांची, तसेच मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर उपनगरीय रेल्वे मार्गालगतच्या झाडांची सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणीला सुरुवात करण्यात आली आहे.

हेही वाचा…मुंबई : वडाळा ‘आरटीओ’च्या तिजोरीत ४८३ कोटी

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी डोंगर उतारावरील झाडांचीही सुयोग्य छाटणी करण्याचे आदेश उद्यान विभागाला दिले आहेत. त्यानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अमित सैनी, उप आयुक्त किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाकडून डोंगर उतार, टेकड्यांवर धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या छाटणीचे काम हाती घेण्यात आले आहे. उद्यान विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार महानगरपालिका क्षेत्रासह वन विभागाच्या हद्दीतील ४० ठिकाणे मिळून एकूण ४१४ धोकादायक झाडे आहेत. उद्यान विभागाच्या पथकांनी या झाडांची छाटणी सुरू केली आहे.

तसेच, १३ मेपर्यंत ४१४ पैकी ३०५ झाडांची छाटणी करण्यात आली आहे. उर्वरित झाडांची छाटणी ७ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबई महानगरात खासगी, तसेच शासकीय मालकीच्या परिसरामधील झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासंदर्भात आतापर्यंत ८ हजार ५५७ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

हेही वाचा…मुंबईतल्या कॅफे मैसूरच्या मालकाला २५ लाखाला लुबाडलं, ‘स्पेशल २६’ स्टाईल दरोडा

दरम्यान, महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यालगतची, तसेच सार्वजनिक ठिकाणच्या झाडांची छाटणी केली जाते. गृहनिर्माण सहकारी संस्था, शासकीय – निमशासकीय संस्था, खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करायची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation prunes dangerous trees ahead of monsoon 305 trees trimmed 109 remaining mumbai print news psg