मुंबई : मुंबईतील वाढत्या प्रदुषणाबाबत न्यायालयाने फटकारल्यानंतर महानगरपालिकेने मंगळवारी ‘सी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील सोन्या – चांदीचे दागिने घडवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली. सोने – चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराड्यांवर ‘सी’ विभागाने हातोडा चालविला. हे कारखाने नागरी वस्त्यांमध्ये असून वायू प्रदुषणास कारणीभूत ठरत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
मुंबई महानगरातील वायू प्रदुषणाचा मुद्दा थेट न्यायालयात गेला आहे. प्रदुषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेने मार्गदर्शक तत्त्वेही तयार केली आहेत. मात्र मुंबई बांधकामाव्यतिरिक्त अन्य अनेक व्यवसाय असून ते प्रदुषणाला कारणीभूत ठरत आहेत. वायू प्रदुषणास कारणीभूत ठरणाऱ्या इतर घटकांवरही महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा : सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सदा सरवणकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
या निर्देशांनुसार नागरी वस्तीत सोने – चांदी वितळवणाऱ्या भट्टींवर (गलाई व्यवसाय) महानगरपालिकेच्या सी विभाग कार्यालयतील इमारत व कारखाने विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘सी’ विभागातील धानजी मार्ग आणि मिझा मार्ग येथील सोने-चांदी वितळवणाऱ्या (गलाई व्यावसाय) एकूण ४ धुराडी (चिमणी) मंगळवारी हटविण्यात आली. अशा प्रकारची कार्यवाही यापुढे देखील सुरू राहणार आहे, अशी माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली.
सोने-चांदी गलाई व्यवसायात छोटेखानी कारखान्यांमध्ये सोने-चांदी वितळवण्यात येते. सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्यातून निर्माण होणारा वायू चिमणी/ धुराड्याच्या माध्यमातून हवेत सोडला जातो. शास्त्रीय प्रक्रिया न करता सोडण्यात आलेल्या वायूमुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. या घातक वायूमुळे प्रदुषणात भर पडत असल्याने मुंबई महानगरपालिकेने वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गलाई व्यावसायिकांविरोधात सक्त कारवाई हाती घेतली आहे. या अंतर्गत चार भट्टी, धुराडे निष्कासीत करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.