मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागांसाठी नव्याने जाहिरात दिली आहे. या भरतीसाठी दहावी व पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट आता काढून टाकण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पदवी परीक्षेत ४५ टक्के गुणांची अट देखील रद्द करण्यात आली आहे. उमेदवारांना ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे. ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. या जागांसाठी यापूर्वी २० ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या परिक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवार दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात किमान ४५ टक्के गुण घेऊन पास झालेला असावा अशी अट घालण्यात आली होती. महाराष्ट्रात आतापर्यंत कोणत्याही परिक्षेला अशी अट नाही. त्यामुळे ही अट काढून टाकावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. कामगार संघटनांनीही हा विषय लावून धरला होता. आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील ही मागणी केली होती. तसेच ही अट रद्द करावी असे लेखी आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने अखेर ही अट रद्द केली आहे.

हेही वाचा – नौदल अधिकाऱ्याची २२ लाखांची सायबर फसवणूक, सांताक्रुझ येथील आरोपीला अटक

सुधारित अर्हतेनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवीन जाहिरातीनुसार २१ सप्टेंबरपासून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत आहे. यापूर्वी प्रसिद्ध जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरुन अर्ज केलेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावरील किंवा https://bit.ly/3XxQNli या लिंकवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात’ ७५ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार! आणखी नवीन ३७ दवाखाने सुरू करणार…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर पदासाठीची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तींसह प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक (यूआरएल) देण्यात आली आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येईल. उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी ९५१३२५३२३३ हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात आला आहे.