लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी चैत्यभूमी, शिवाजी पार्क, राजगृह परिसरात महापालिका प्रशासनाने विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. जलप्रतिबंधक निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, निरीक्षण मनोरे, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छता, आरोग्य तपासणी, तसेच औषधोपचार या अनुषंगाने सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी आवश्यक नागरी सेवा-सुविधांची पूर्तता करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविधस्तरिय कार्यवाही करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही. आय. पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह मोबाइल चार्जिंग सुविधा आदी सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे आठ हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहेत. त्यासोबतच चैत्यभूमीतील थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यांवर करण्यात येणार असून समाजमाध्यमांद्वारेही थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-मासळी विक्रेत्या महिल्यांच्या शौचालयावर पालिकेचा हातोडा
महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी, दादर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा – सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे अनुयायांसाठी देण्यात आलेल्या सेवा-सुविधांची गगराणी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सोमवारी आढावा घेतला. यावेळी उपायुक्त प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अनुयायांना नागरी सेवा-सुविधा देण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहे. महानगरपालिका व मुंबई पोलिस दल इत्यादींतर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन भूषण गगराणी यांनी केले आहे.
वैद्यकीय सेवा उपलब्ध
महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या वैद्यकीय चिकित्सा सुविधेमध्ये ३ कक्ष उभारण्यात येणार आहेत. तसेच ११ रूग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मैदान परिसरात अनुयायांच्या सुविधेसाठी आरोग्य तपासणी आणि औषधोपचारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण वैद्यकीय आणि सहायक वैद्यकीय कर्मचारी मिळून ५८५ मनुष्यबळ यंदा कार्यरत असणार आहे. गतवर्षी एकूण १३ हजार ८२४ अनुयायांनी आरोग्य तपासणी आणि औषधोपचारांचा लाभ घेतला होता, अशी माहिती अजितकुमार आंबी यांनी दिली.
आणखी वाचा-मीरा-भाईंदरची मुबलक पाण्याची प्रतीक्षा कायम
‘भीमा तुम्हा वंदना’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. प्रतिवर्षी या माहिती पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्यभूमी येथे करण्यात येते. या वर्षीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन ५ डिसेंबर रोजी विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अभिवादनपर गीते या मध्यवर्ती संकल्पनेवर ‘भीमा तुम्हा वंदना’ माहिती पुस्तिका आधारित आहे.
पालिकेतर्फे करण्यात आलेल्या इतर सोयी – सुविधा
- लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा
- संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था
- अग्निशमन दलामार्फत आवश्यक सेवा
- चौपाटीवर सुरक्षा रक्षकांसह बोटींची व्यवस्था
- चैत्यीभूमी स्मारकातील आदरांजली कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण
- फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), यूट्यूब या समाजमाध्यमांवर महानगरपालिकेच्या अधिकृत खात्याद्वारे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था
- विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्टॉल्सची रचना
- राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष
- स्काऊट गाईड हॉल येथे भिक्खू निवासाची व्यवस्था
- मैदानात धुळीचा त्रास रोखण्यासाठी पायवाटेवर आच्छादनाची व्यवस्था
- अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीवर स्थळ निदर्शक फुग्यांची व्यवस्था
- मोबाइल चार्जिंगकरीता छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे पॉइंटची व्यवस्था
- फायबरच्या तात्पुरत्या स्नानगृहाची व तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था
- रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत व बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था
- स्नानगृहे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था