लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : नाताळनिमित्त शाळांना पडलेल्या सुट्ट्यांमध्ये भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) पर्यटकांनी गजबजली. मुलांना बागेतील प्राणिसंपदा, वनस्पती आणि विविध झाडांची ओळख व्हावी, याहेतूने बहुतांश पालकांनी राणीच्या बागेला पसंती दिली. केवळ सहा दिवसांत ९७ हजार पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ३५ लाख रुपयांहून अधिक महसूल जमा झाला. रविवारी सर्वाधिक म्हणजेच सुमारे २ लाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली. त्यातून पालिकेला १० लाख रुपये महसूल मिळाला.
दुर्मिळ जातीच्या वनस्पती, पक्षांचा किलबिलाट, विविध प्राण्यांचा वावर आदींमुळे राणीच्या बागेत कायमच पर्यटकांची गर्दी असते. प्राण्यांविषयी असलेल्या कुतूहलापोटी लहान मुले राणीच्या बागेत जाण्यासाठी पालकांकडे हट्ट करतात. गेल्या काही वर्षात राणीच्या बागेत नवनवीन प्राणी – पक्ष्यांची संख्या वाढल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक राणीच्या बागेला भेट देत आहेत. यंदा नाताळनिमित्त शाळांना सुट्ट्या पडल्यामुळे अनेकजण मुंबईबाहेर गेले आहेत. मात्र, अनेकांनी मुंबईत राहूनच नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी विविध बेत आखले. त्यानुसार, नागरिकांनी निसर्ग आणि प्राण्यांच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी राणीच्या बागेची निवड केली. २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान एकूण ९७ हजार ५८६ पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली. नाताळनिमित्त २५ डिसेंबर रोजी राणीची बाग पर्यटकांसाठी खुली ठेवण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी राणीची बागा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे २६ डिसेंबर वगळता अन्य सहा दिवसांत पर्यटकांनी दिलेल्या भेटीतून एकूण ३५ लाख ८१ हजार ८९५ रुपये महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला.
आणखी वाचा-२० टक्के योजनेतील पाच हजार घरांचा प्रश्न
पालिकेच्या तिजोरीत २९ डिसेंबर रोजी सर्वाधिक म्हणजेच १० लाख ४ हजार ३९० रुपये जमा झाले. तर, नववर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वात कमी म्हणजेच ४ लाख ३० हजार २५० रुपये पालिकेला प्राप्त झाले. केवळ सहा दिवसांत ९७ हजार पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ३५ लाख रुपयांहून अधिक महसूल जमा झाला.
सहा दिवसांतील पर्यटकांची संख्या
दिवस | पर्यटक | महसूल |
२५ डिसेंबर | १०४११ | ३७४१५० |
२७ डिसेंबर | १०७३७ | ४६७००० |
२८ डिसेंबर | २२७७९ | ८१०४९५ |
२९ डिसेंबर | २८५८३ | १००४३९० |
३० डिसेंबर | १३४४७ | ४९५६१० |
३१ डिसेंबर | ११६२९ | ४३०२५० |