मुंबई : आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असून आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलक विभागाने ५३९२ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. करवसुलीचे उद्दिष्टय गाठण्यास अजून ८०० कोटींची तूट आहे. एकूण उद्दिष्ट्याच्या ८७ टक्के करवसुली करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे.

पालिका प्रशासनाने चालू अर्थसंकल्पात मालमत्ता करातून ४९५० कोटींचे उत्पन्न मिळेल असे गृहित धरले होते. मात्र चालू अर्थसंकल्पात सुधारणा करताना मालमत्ता कराच्या उद्दिष्टयात १२५० कोटींनी वाढ करण्यात आली. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्टय ४९५० वरून ६२०० कोटींपर्यंत सुधारित करण्यात आले आहे. या उद्दीष्टापैकी आतापर्यंत ५३९२ म्हणजेच ८७ टक्के मालमत्ता कर वसूल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी दिली.

कर वसुलीसाठी उपाययोजना

मालमत्ताधारकांना नोटीसा बजावणे, जप्ती, अटकावणी अशा उपाययोजना केल्या जात असून अनेक मालमत्ताधारक शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच ३० मार्च पर्यंत करभरणा करतात. आर्थिक वर्ष संपण्यास अजून दहा दिवस शिल्लक असून या कालावधीत हे उद्दीष्ट्य साध्य केले जाईल, असाही विश्वास बेल्लाळे यांनी व्यक्त केला.

विविध कारणांमुळे मालमत्ता करामध्ये घट

मालमत्ता कर मुंबई महापालिकेचा एक महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. जकात रद्द झाल्यानंतर पालिकेकडे मालमत्ता कर आणि विकास नियोजन हे दोन महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत उरले आहेत. तसेच जकातीपोटी नुकसान भरपाईतूनही पालिकेला उत्पन्न मिळत असते. मालमत्ता करातून दरवर्षी पालिकेला सुमारे सहा हजार कोटींचे उत्पन्न मिळत असते. मालमत्ता कराच्या दरात दर पाच वर्षांनी सुधारणा करण्याची महापालिका कायद्यात तरतूद आहे. २०२० मध्ये मालमत्ता कराच्या दरात सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र करोना व टाळेबंदी आणि राजकीय विरोध यामुळे ही सुधारणा होऊ शकली नाही. त्यामुळे मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होण्याऐवजी घटच होत गेली. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने पालिकेच्या मालमत्ता करप्रणालीतील तीन नियम नव्याने तयार करण्यास सांगितल्यामुळे यंदाही मालमत्ता कराच्या दरात वाढ होऊ शकली नाही.

कराचे सुधारित उद्दीष्ट्य

यंदा पालिकेच्या करनिर्धारण विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी मोठी मोहीम हाती घेतली असून त्याला चांगले यश आले आहे. पालिकेने यंदा डिसेंबर महिन्यातच चार हजार कोटींची वसुली केली. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सुधारित करताना मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न सुधारित करण्यात आले होते. मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नात १२५० कोटींची वाढ झाली असून ६२०० कोटींची मालमत्ता कर वसुली करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षात मालमत्ता कराचे उद्दीष्ट्य कमी करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. यंदा मात्र मालमत्ता कराच्या उद्दीष्टात वाढ झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नाला यंदा मालमत्ता कर संकलनाने चांगलाच हात दिला आहे.

गेल्या काही वर्षातील मालमत्ता करातील उत्पन्न

वर्षकरातील उत्पन्न
२०२१-२२५७९१ कोटी
२०२२-२३५५७५ कोटी
२०२३-२४४८५९ कोटी
२०२४-२५५३९२ कोटी (१८ मार्चपर्यंत)

Story img Loader