मुंबई : मुंबईतील उद्यानांत यापुढे कोणतीही अनुचित घडना घडल्यास त्यासाठी उद्यानांच्या देखभालीसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारांना जबाबदार धरले जाईल. त्याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आल्याची माहिती महापालिकेच्यावतीने सोमवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. गेल्या वर्षी वडाळास्थित महापालिकेच्या महर्षी कर्वे उद्यानातील उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपरोक्त निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी, महापालिकेच्यावतीने वरिष्ठ वकील अनिल सिंह आणि ऊर्जा धोंड यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेप्रकरणी महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच, उद्यानाच्या देखभालीचे कंत्राट मिळालेल्या हिरावती एन्टरप्रायझेस या कंपनीचा पर्यवेक्षक पाटीराम यादव याच्याविरोधात निष्काळजीपणाच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच मुंबईतील उद्याने, खेळाची मैदाने, खुल्या जागा, मनोरंजन मैदाने यांच्या देखभालीसाठी महापालिकेतर्फे नियमित निविदा काढण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार, २०२३ मध्येही निविदा काढण्यात आल्या होत्या त्यावेळी, १८ महिन्यांचे कंत्राट देण्यात आले होते. परिमंडळानुसार त्या क्षेत्रातील उद्याने, खेळाची मैदाने, खुल्या जागा, मनोरंजन मैदाने यांच्या देखभालीचे कंत्राट देण्यात आले. परिमंडळ-२ मधील उद्याने, खेळाची मैदाने, खुल्या जागा, मनोरंजन मैदानांच्या देखभालीचे कंत्राट हिरावती एन्टरप्रायझेस या कंपनीला देण्यात आले होते. त्यामुळे, महर्षि कर्वे उद्यानातील घटना घडली त्यावेळी उद्यानाच्या देखभालीचे कंत्राट कंपनीकडे होते. म्हणूनच कंत्राटदाराने या प्रकरणी १० लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयात जमा केली. ती पुढे मुलांच्य पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली, असे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

या घटनेनंतर, उद्याने, खेळाची मैदाने, खुल्या जागा, मनोरंजन मैदानांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी देखभालीची जबाबदारी असलेल्या कंत्रादारांची राहील, असा निर्णय घेण्यात आल्याचेही महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायालयाने महापालिकेच्या या प्रतिज्ञापत्राची नोंद घेतली. महर्षि कर्वे उद्यानातील गेल्या वर्षीच्या या घटनेची न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली होती. तसेच, अशा घटनांप्रकरणी जबाबदारी निश्चित करणारे धोरण आखण्याचे आदेश महापालिकेला दिले होते.

प्रकरण काय ?

वडाळास्थित डेव्हिड बर्रेटो मार्गानजीकच्या महर्षी कर्वे उद्यानात १७ मार्च २०२४ रोजी खेळायला गेलेले अंकुश (४) आणि अर्जुन (५) मनोज वगरे या दोन मुलांचा उद्यानातील उघड्या असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला होता. दोन्ही मुले रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे त्यांच्या पालकांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांचा शोध न लागल्याने पालकांनी नजीकच्या पोलिसांत मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. या दोघांचा मृतदेह १८ मार्च रोजी सकाळी सापडल्यानंतर हे प्रकरण उघडीस आले होते.